स्वराज्याच्या यज्ञवेदीवरून काळासोबत वाघासारखा चालणारा ।
मराठी मुलुखातील रयतेचा हा राजा, जाणता राजा छत्रपती झाला ।।
कथा शिवबांच्या शिलेदारांची, अशी बाणेदार टॅग लाईन असलेली ‘जय भवानी जय शिवाजी’ हि मालिका स्टार प्रवाह वाहिनीवर चालू आहे. जेष्ठ अभिनेत्री निशिगंधा वाड यांनी तब्ब्ल एका दशकानंतर केलेल्या पदार्पणची बातमी तुम्ही आपल्या साईटवर याअगोदर पाहिली असेल. निशिगंधा जिजाऊ आऊसाहेबांच्या भूमिके बद्दल बोलताना म्हणाल्या की, “पालनकृत, ताठ कण्याच्या, कर्तबगार, कर्तृत्ववान जिजाऊ साकारणं हे भाग्याचं आहे.. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्य स्थापनेमध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे… इतकी कणखर भूमिका साकारणं हा माझ्यासाठी दैवी योग आहे”.
ऐतिहासिक भूमिका इतक्या दैदिप्यमान आहेत कि कोणासाठीही त्यातील छोटासा भाग बनायला मिळणे हि गोष्ट भाग्याची ठरू शकते आणि त्यात जर छत्रपती शिवरायांची भूमिका साकारायला मिळत असेल तर कलाकाराच्या आयुष्याचे सार्थक झाल्यासारखे आहे.. मराठी अभिनेता भूषण प्रधान तब्ब्ल ८ वर्षांनंतर जय भवानी जय शिवाजी या आगामी टीव्ही शोद्वारे टीव्हीवर पुनरागमन केले आहे. भूषण शिवरायांची (छत्रपती शिवाजी महाराज) भूमिका साकारणार आहे आणि त्याबद्दल तो खूप उत्साहित आहे. भूषण यांनी पडद्यावर छत्रपतींच्या या ऐतिहासिक भूमिकेसाठी केलेली शरीर मेहनत, घोडेस्वारी, अभिनयाची तयारी आणि पडद्यावर अशा आयकॉनिक भूमिकेचे प्रतिनिधित्व करणे ही एक मोठी संधी आणि जबाबदारी आहे असे विधान केले.
ऐतिहासिक टीव्ही शो जय भवानी जय शिवाजी आणि पडद्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारताना बोलताना भूषण म्हणाले: “ही केवळ एक संधी नाही, ती आहे एक जबाबदारी, छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणे ही माझ्या स्वप्नांची भूमिका आहे. ही भूमिका ऑनस्क्रीन चित्रित करण्यासाठी खूप तयारी आणि मेहनत आवश्यक होती. वाचन कौशल्य, शारीरिक कसरत आणि बरीच मानसिक तयारी करण्याचे भले मोठे आव्हान माझ्यासमोर होते. छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित पुस्तके, लेख आणि कादंबऱ्या वाचन सुरु केले आणि भूमिका खोलवर समजण्यासाठी महाराजांचे विविध पोवाडे देखील ऐकले. छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका ही माझ्या अभिनय कारकिर्दीतील सर्वोच्च शिखर ठरेल याचा मी पुरेपूर प्रयत्न करेन.”
मालिकेतील बाल शिवबा आता मोठे झाले आहेत आणि येथूनच शिवरायांच्या भूमिकेतील भूषणची मालिकेत एंट्री होते. जिजाऊंच्या भूमिकेतील निशिगंधा वाड यांचा अभिनय त्यांच्या एकंदरीत अनुभवाचा चालता बोलता नजराना आहे. वीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या भूमिकेत प्रसिद्ध अभिनेते अजिंक्य देव, छञपतींसाठी प्राणार्पण करणारे शिवा काशिद यांच्या भूमिकेत कलाकार विशाल निकम तर अतुलनीय पराक्रमाच्या जोरावर प्रति शिवाजी अशी उपाधी धारण करणारे नेतोजी पालकर यांच्या भूमिकेत अभिनेते कश्यप परुळेकर या प्रमुख व्यक्तिरेखा प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करीत आहेत. हि मालिका तुम्हाला आवडत असल्यास प्रतिक्रिया नोंदवायला विसरू नका.