नुकत्याच पार पडलेल्या झी चित्रगौरव पुरस्कार सोहळ्यात प्रिया बेर्डे यांनी हजेरी लावली होती. या पुरस्कार सोहळ्यात लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. भरत जाधव यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांना त्यांच्या खास अंदाजात मानवंदना दिली. सोहळा झाल्यानंतर प्रिया बेर्डे यांनी मीडियाशी संवाद साधला त्यावेळी त्यांना अनेक प्रश्न विचारून बोलतं करण्यात आलं. यावेळी त्यांना त्यांच्या अपूर्ण राहिलेल्या काही गोष्टींबद्दल विचारले तेव्हा प्रिया बेर्डे यांनी पॅराग्लायडिंग करण्याची इच्छा व्यक्त केली.
काही देवस्थानांना त्यांनी याअगोदर भेटी दिल्या आहेत. पण आणखी काही देवस्थानांना भेट देण्याची इच्छा त्यांनी इथे व्यक्त केली. लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या पश्चात प्रिया बेर्डे यांनी त्यांच्या दोन्ही मुलांचे पालनपोषण केले. अभिनय क्षेत्रातही त्यांनी काम करून आर्थिक दृष्टीने स्थिरस्थावर केले. याचजोडीला त्यांनी हॉटेल व्यवसायातही धाडसी पाऊल टाकले. आताच्या इंडस्ट्रीतील काही लोकांबाबत त्यांनी एक खंत यावेळी बोलून दाखवली. पुरस्कार सोहळे हे एकत्रित जमण्याचे माध्यम असते. यातून अनेक नवीन व्यक्तींची ओळख होते. पण आताचे कलाकार आपणहून बोलल्याशिवाय बोलत नाहीत अशी एक त्यांची खंत आहे.
तुम्ही इंडस्ट्रीत आहात तर तुम्हाला ओळख करून द्यायची गरज नसते. मला ते सांगावं लागतं की, नमस्कार मी प्रिया बेर्डे वगैरे. मग तेही त्यावर त्यांचं नाव सांगून ओळख देतात. पण काय गरज आहे या सगळ्याची. मग कधी कधी बघूनही न बघितल्याची प्रतिक्रिया दिली जाते. ओळखच न देणं अशा गोष्टी अलीकडे खूप वाढल्या आहेत. हो पण आता जग बदलत आहे, लोकांचे अटीट्युड बदलत चालले आहेत. स्वतःकडे आणि लोकांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत चालला आहे. मला वाटतं हा बदल मीही स्वीकारायला पाहिजे. मीही स्वतःमध्ये हा बदल करायला हवा. आणि तसं पाहिलं तर ही इंडस्ट्री एवढीशी आहे यात तुम्ही कुठे तुमचा अटीट्युड दाखवायला जाता.
एकमेकांना महत्व प्राप्त करून घ्यायला जाता, खर तर याची गरजच नाहीये. प्रेक्षक आपल्याला प्रेम देतात आणि तिथूनच आपण मोठे होत असतो. इंडस्ट्रीत अशी लोकं का वागतात, हे अजूनही मला कळलेलं नाहीये. मी तीन चार वेळेला ओळख दाखवते पण त्यांनी जर लक्षच दिलं नाही तर मग पाचव्या वेळी मी फाट्यावर मारते. माणसं जोडणं फार कठीण असतं पण मला ते जोडायला आवडतं.