अभिनेते शरद पोंक्षे आता अभिनय क्षेत्राच्या जोडीला निर्मिती क्षेत्रात पाऊल टाकत आहेत. एक अभिनेता म्हणून शरद पोंक्षे यांनी मराठी सृष्टीत विविध धाटणीच्या दमदार भूमिका साकारल्या आहेत. मध्यंतरी कॅन्सर सारख्या गंभीर आजाराशी त्यांनी यशस्वी झुंज दिलेली पाहायला मिळाली. अशा कठीण प्रसंगातही खचून न जाता त्यांनी स्वतःला सावरले आणि अभिनय क्षेत्रात पुनरागमन केले. पण आता शरद पोंक्षे स्वतःच्या निर्मिती संस्थेतून एक चित्रपट बनवत आहे. चित्रपटाचे नाव अजून जाहीर करण्यात आले नसले तरी चित्रपटात त्यांचा मुलगा स्नेह पोंक्षे दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार आहे.
चित्रपटाच्या माध्यमातून स्नेहचे प्रथमच दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल पडत आहे. स्नेह पोंक्षे हा नाट्य अभिनेता आहे. छोट्या छोट्या भूमिकेतून तो रंगमंचावर झळकला आहे. पण आता कॅमेऱ्यामागे राहून तो मोठा पडदा गाजवू शकतो. ही जबाबदारी त्याला वडिलांकडून मिळत असल्याने आपल्या या नवीन भूमिकेबाबत कमालीचा उत्सुक आहे. याबद्दल शरद पोंक्षे यांनीच जाहीर केले आहे की, माझी निर्मिती व माझा मुलगा स्नेहचा दिग्द असलेला पहिला सिनेमा सुरू करतोय. आशिर्वाद असूदेत. आज पर्यंत माझ्या प्रत्येक कलाकृतीवर प्रेम केलत तसच ह्या सिनेमावरही कराल अशी आशा बाळगतो. स्नेह पोंक्षे लिखीत दिग्दर्शित हा सिनेमा दिवाळी २४ पर्यंत प्रदर्शित करण्याचा प्रयत्न आहे. शिर्षक लवकरच जाहिर करू.
मिठीबाई कॉलेजमध्ये असताना स्नेहने नाटकातून काम करण्यास सुरुवात केली. शरद पोंक्षे यांच्या नथुराम गोडसे या नाटकात स्नेह एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसला होता. अभिनयाचे बाळकडू वाडीलांकडूनच मिळाले असले तरी आता तो दिग्दर्शन क्षेत्रात नशीब आजमावताना दिसणार आहे. तूर्तास या चित्रपटाचा विषय नेमका काय असणार आहे आणि त्याचा शुभारंभ कधी होईल ते लवकरच जाहीर करण्यात येईल. प्रोडक्शन नं १ या निर्मिती संस्थेतून चित्रपटाची पूर्व तयारी करण्यात आली असून रोहिणी विजयसिंह पटवर्धन निर्मात्या असणार आहेत. तर शरद पोंक्षे हे या चित्रपटाचे सहनिर्माते असणार आहेत. या चित्रपटातून पोंक्षे कुटुंब पहिल्यांदाच निर्मिती आणि दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल टाकत असल्याने यानिमित्ताने प्रेक्षकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.