लग्नाच्या वाढदिवसाचा सोहळा हा मराठी सृष्टीतील काही सेलिब्रिटींसाठी खूपच खास ठरला आहे. काही वर्षांपूर्वी अभिनेते भारत गणेशपुरे यांनीही लग्नाच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पुन्हा एकदा लग्नगाठ बांधली होती. त्यापाठोपाठ अभिनेत्री वंदना गुप्ते यांनीही शिरीष गुप्ते सोबत लग्नाच्या ५० व्या वाढदिवशी पुन्हा एकदा लग्नगाठ बांधून सगळ्यांना आश्चर्यचकित केले होते. आता मराठी सृष्टीतील प्रसिद्ध गायक नंदेश उमप यांनीही लग्नाचा २५ वा वाढदिवस अशाच थाटात साजरा केलेला पाहायला मिळतो आहे.
लोककलाकार शाहीर विठ्ठल उमप यांच्या पावलावर पाऊल टाकत त्यांचा मुलगा नंदेश उमप यांनीही कला क्षेत्राची वाट धरली. पोवाडा, लोकगीतं, कोळीगीतं, कव्वाली, चित्रपट गीतं अशी विविध ढंगातली गायकी त्यांनी रंगवली आहे. मी मराठी या कर्यक्रमाचे २००७ सालापासून आतापर्यंत १०९० प्रयोग महाराष्ट्रभर त्यांनी गाजवले आहेत. १६ मार्च १९९९ रोजी सरिता सोबत ते विवाहबद्ध झाले. काल नंदेश आणि सरिता उमप यांच्या लग्नाचा २५ वा वाढदिवस मोठ्या थाटात साजरा करण्यात आला. या दिवसाचे औचित्य साधून नंदेश उमप यांची लेक आयुषी उमप हिने त्यांच्या लग्नाचा पुन्हा एकदा घाट घातला.
यावेळी संपूर्ण उमप कुटुंबीय आणि मराठी सृष्टीतील काही खास सेलिब्रिटींना तिने आमंत्रित केले होते. सुकन्या कुलकर्णी, समीरा गुजर यासह अनेक कलाकारांनी त्यांच्या या लग्नसोहळ्याला हजेरी लावली होती. तर समीरा गुजर ही मी मराठी या कार्यक्रमाची सदस्य असल्याने उमप कुटुंबियांशी तिचे भावनिक संबंध जोडले गेले आहेत. बावनकशी सोन्यासारख्या मौल्यवान जोडीचा संसाराचा रौप्य महोत्सव, हे माझंच कुटुंब आहे आणि हे कुटुंब असेच आनंदात राहो म्हणत भावाला आणि वहिनीला तिने लग्नाच्या रौप्यमहोत्सवी शुभेच्छा दिल्या आहेत.