मोरूची मावशी अजरामर करणारे विजय चव्हाण यांना आपल्यातून जाऊन जवळपास ६ वर्षे झाली आहेत. विजय चव्हाण पडद्यावर जेवढे शिस्तबद्ध वाटायचे तेवढे ते प्रत्यक्षात नसायचे, खऱ्या आयुष्यात ते खूपच अवखळ होते. आयुष्यात त्यांनी कधीच घड्याळ आणि मोबाईल वापरला नव्हता हे त्यांच्याबाबतीत विशेष म्हणावं लागेल. सांसारिक वृत्ती त्यांच्यात असायची. हीच आठवण त्यांची पत्नी विभावरी यांनी नुकत्याच दिलेल्या सुलेखा तळवलकर यांच्या मुलाखतीत करून दिली आहे. विजय चव्हाण यांची पत्नी विभावरी जोशी या देखील अभिनेत्री होत्या.
मोरूची मावशी या नाटकात एकत्रित काम करत असतानाच एकदिवस विजय चव्हाण यांनीच त्यांना अचानकपणे लग्नाची मागणी घातली होती. त्यांची ही लव्हस्टोरी नेमकी कशी होती ते जाणून घेऊयात. त्या काळात मोरूची मावशी हे नाटक विजय चव्हाण यांनी रंगमंचावर चांगलंच गाजवलं होतं. याच नाटकात विभावरी जोशी एका महत्त्वाच्या भूमिकेत होत्या. नाटकात काम करत असल्याने त्यांची फक्त ओळख होती. नाटकात विभावरीच्या खांद्यावर हात ठेवताना सुद्धा ते अगदी पोकळ हात करून ठेवायचे. त्यामुळे त्यांच्यात प्रेम जुळेल असे कोणालाही वाटले नव्हते. पण माणूस म्हणून विजय चव्हाण एक उत्तम व्यक्तिमत्त्व आहे याची प्रचिती विभावरी यांना वेळोवेळी अनुभवायला मिळाली. नाटकाच्या मुलींना कपडे बदलताना काही त्रास होऊन नये म्हणून ते जातीने लक्ष देऊन असायचे.
मेकअप रूम बाहेरून ते सुरुवातीलाच एक फेरी मारून जायचे. त्यांच्यातली ही काळजी विभावरी यांना आवडू लागली होती. एक दिवस डोंबिवलीला प्रयोग होता त्या दिवशी विजय चव्हाण यांचा वाढदिवस होता. नेमकं त्याच दिवशी त्यांनी विभावरीकडे तिचा फोन नंबर मागितला. एकाच नाटकात काम करत असल्याने विभावरीला प्रश्न पडला. पण त्यानंतर विजय चव्हाण यांनी सांगितलं की, तू त्या दिवशी नंबर दिला नसता तर नाही विचारायचं हे ठरवलं होतं. हिचा माझ्यावर विश्वास आहे की नाही हे त्यांना बघायचं होतं. पण विजय चव्हाण यांनी असे विचारल्यावर विभावरी यांनीही लगेचच फोन नंबर देऊन टाकला होता. त्यानंतर विजय चव्हाण यांनी विभावरीकडे लग्नाची मागणी घातली.
विभावरी या ब्राह्मण आणि विजय चव्हाण हे अस्सल नॉनव्हेज प्रेमी, शिवाय विभावरी यांचं स्वतःच कौलारू घर तर विजय चव्हाण चाळीत राहणारे. त्यामुळे आपल्यात खूप फरक आहे असा विचार विभावरी यांच्या मनात आला. पण दुसऱ्या कोणाशी लग्न करण्यापेक्षा त्याच्यासोबत आपण काम करतोय. ज्याला आपण माणूस म्हणून एवढं चांगलं ओळखतोय त्याच्याशी लग्न का नाही करायचं, म्हणून त्यांनी दोन दिवसांनी हा लग्नाचा प्रस्ताव स्वीकारला. फेब्रुवारी महिन्यात विजय चव्हाण यांनी विभावरीला लग्नाची मागणी घातली होती, त्यानंतर मे महिन्यात त्यांनी मोठ्या थाटात लग्नही केले होते. प्रेमात वैगेरे न पडताच विजय चव्हाण यांनी विभावरीलाच थेट लग्नाची मागणी घातली होती.