मुक्ता बर्वे हिची प्रमुख भूमिका असलेला नाच गं घुमा हा चित्रपट १ मे रोजी प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाला नम्रता संभेराव, मायरा वायकुळ, सुकन्या कुलकर्णी, स्वप्नील जोशी, मधूगंधा कुलकर्णी, शर्मिष्ठा राऊत अशी भली मोठी स्टार कास्ट लाभली आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने मुक्ता बर्वे हिने मीडियाला एक मुलाखत दिली आहे. अभ्यासू अभिनेत्री अशी ओळख असलेल्या मुक्ता बर्वे हिने सुरुवातीला नाटकातून अभिनय क्षेत्रात पाऊल टाकले होते. पण चित्रपटात एका गाण्यासाठी तिला लक्ष्मीकांत बेर्डे सोबत झळकता आले होते.
चित्रपटात तिची एन्ट्री कशी झाली याबद्दल ती सांगते की, खट्याळ सासू नाठाळ सून चित्रपटात मी लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबत खूप धमाल नाचले होते. या चित्रपटात बालकलाकार माझा मोठा भाऊ आहे. मास्टर निनाद असं दादाच्या चित्रपटात त्याचं नाव होतं. त्यावेळी लहान मुलांचं शूटिंग मे महिन्यात होत असायचं. मी त्यावेळी ४ वर्षांची होते. मीही दादाच्या चित्रपटाच्या शूटिंगला आईसोबत गेले होते. खट्याळ सासू नाठाळ सून या गाण्याचं शूटिंग तिथे चालू होतं. गाणं वाजलं तसं मी नाचत नाचत पुढे गेले. त्यावेळी मी मध्ये आले म्हणून शूटिंग कट करण्यात आलं. चित्रपटाचे दिग्दर्शक अण्णासाहेब देऊळगावकर यांनी कट कट म्हणत ही निनादची बहीण आहे ना असं म्हटलं. आपल्यामुळे शूटिंग थांबलं म्हणून आई खूप घाबरली होती. तिने सॉरी सॉरी म्हणत मला बाजूला घेतलं.
पण देऊळगावकर यांनी आईला ती खूप चांगलं नाचतीये तीचे नवीन कपडे असतील तर घालून या असं सांगितलं. कोल्हापूरला चित्रपटाचं शूटिंग चालू होतं. हॉटेलवर कपडे असल्याने आई आणि स्मिता तळवलकर दोघीही गाडीने कपडे घेऊन आल्या. दादाच्या मुंजीत त्याचे जे कपडे होते तेच मी त्या गाण्यात घातले होते. झब्बा, पायजमा आणि जॅकेट घालून मी पहिल्यांदा सिनेमात नाचले होते. अस मुक्ता बर्वे तिच्या चित्रपटातील पदार्पणाबाबत सांगते. खट्याळ सासू नाठाळ सून या चित्रपटात बरेचसे मोठे सेलिब्रिटी झळकले होते. दया डोंगरे, नितीश भारद्वाज, लक्ष्मीकांत बेर्डे, वर्षा उसगावकर यांच्या या चित्रपटात महत्वाच्या भूमिका होत्या. या चित्रपटात मुक्ता बर्वे देखील झळकली हे आज तिच्या या मुलाखतीतून उलगडले आहे.