मुलुंड ईस्ट भागात पीएपी आणि धारावीच्या नागरिकांचं पुनर्वसन केलं जात आहे. प्रशासनाने ह्या दोन नवीन प्रोजेक्टसाठी मुलंड ईस्टची निवड केली आहे. या भागात जवळपास साडेसात हजार घरं बांधण्यात येणार आहेत. त्यामुळे पीएपी आणि धारावीच्या जवळपास ४० हजार नागरिकांना घरं दिली जाणार आहेत. मुलुंड ईस्टमध्ये वास्तव्यास आलेला मराठी अभिनेता चैतन्य चंद्रात्रे या नवीन प्रोजेक्टबद्दल संभाव्य धोका लक्षात आणून देण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे. माझी तुझी रेशीमगाठ या लोकप्रिय मालिकेत चैतन्य झळकला होता. त्याने या प्रोजेक्टबद्दल सविस्तर अशी एक पोस्ट लिहिली आहे.
सोबतच व्हिडिओच्या माध्यमातून एक भीती देखील व्यक्त केली आहे. पीएपी पुनर्वसन म्हणजे ही लोकं भारताबाहेरून आपल्या देशात राहायला आलेली लोकं आहेत. या लोकांनी शासनाच्या मिळेल त्या मोकळ्या जागेत घरं बांधलेली असतात. कित्येक वर्षे ते तिथे राहतात, मग प्रशासन त्यांना पक्की घरं बांधून देतात. मुलुंड ईस्ट या एवढ्या छोट्याशा जागेत प्रशासन ह्यांना ७५०० घरं बांधून देत आहे. याठिकाणी अगोदरच १ लाख २५ हजार लोकसंख्या आहे. त्यामुळे या ४० हजार लोकांचा बोजा मुलुंड ईस्टवर पडणार आहे. हे नवीन प्रकल्प विभागून द्यायला हवेत, एकट्या मुलुंडवर एवढा भार नको असे मत त्याने व्यक्त केलं आहे. याबद्दल चैतन्यने एक भीती व्यक्त करताना म्हटले आहे की, मुलुंड ईस्ट मधील ५० टक्के लोकं मतदान करतात.
पण ह्या पुनर्वसन झालेल्या ४० हजार लोकांनी त्यांच्यामधूनच लोकप्रतिनिधी निवडून आणला तर त्याबद्दल नक्कीच काळजी घ्यायला हवी. हे प्रोजेक्ट होऊ नयेत म्हणून कोर्टात ही लढाई अगोदरच सुरू आहे. पण तुमचा आमचा त्यात सहभाग असायला हवा म्हणून जागे व्हा आणि रस्त्यावर उतरून ही लढाई लढा. एवढ्याशा मुलुंडवर हा एवढा मोठा भार कशासाठी. घरातील एखाद्या व्यक्तीला कॅन्सर झाला तर आपण त्याला काहीतरी उपचार करतोच ना की त्याला सोडून देतो. आपल्याला जेवढे उपचार करता येतील तेवढे करूया हे मुलुंड ईस्ट वाचवण्यासाठी. हीच ती योग्य वेळ आहे जागे होण्याची असे चैतन्यने या व्हिडिओत म्हटले आहे.