कुठल्याही कलाकाराला काम मिळवण्यासाठी आणि आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी संघर्ष करावाच लागतो. भल्याभल्याना हा संघर्ष चुकलेला नाही. असाच काहीसा अनुभव तुझ्यात जीव रंगला मालिकेतील गोदाक्का यांनीही घेतला आहे. तुझ्यात जीव रंगला मालिकेतील गोदाक्का हे पात्र अभिनेत्री छाया सांगावकर यांनी साकारले होते. मराठी चित्रपट, नाटक, मालिका असा त्यांचा प्रवास अविरतपणे सुरू आहे. या प्रवासात अनेक चांगले वाईट अनुभव त्यांना मिळत गेले. गेल्या काही दिवसांपासून छाया सांगावकर त्यांच्या अनुभवाबद्दल भरभरून लिहिताना दिसत आहेत.
गुलछडी चित्रपटात काम करत असताना त्यांना मानसिक त्रास सहन करावा लागला होता. हा धक्कादायक अनुभव शेअर करताना त्या म्हणतात की, आज आहे अभिनेते कुलदीप पवार यांचा विषय. मी आणि कुलदीपजी गुलछडी चित्रपटात एकत्र होतो. या चित्रपटाच्या वेळी मला खुप मानसिक त्रास व्हायचा. पहिल्याच दिवशी जहागिरदाराची सुन म्हटल्यावर मेअकपदादा आणि हेयरड्रेसरने मला पुर्ण तयार केली. आणि मग काय, हिरोईन आणि निर्माती, सुषमा शिरोमणीने माझा मेअकप झालेला काढायला सांगितले. मेअकप नको फक्त कुंकू लावा,साडी पण चापुनचुपून नको, केस चपटे विंचरा. मला कळेना मी एका मोठ्या घराण्यातील जाहगिदाराची सुन,आणि अशी का दाखवली जाते? मग मी विचार केला, असेल कदाचित त्रास दिला जात असेल सुनेला.
पण पुढे ही खुप मानसिक त्रास होऊ लागला, मला सिन कोणता आहे किंवा काय करायचे आहे? काही सांगितलं जायचं नाही. एकदम सिनला उभं करायचं, मी भांबावून जायची. कुठे उभं रहायचं हे पण सांगितलेले नसायचे. मग माझ्यावर ओरडायला सुरू करायचं आणि मी सांगायला गेले की मला सिन माहीत नाही, तर मला बोलुच द्यायचे नाही. असे चार पाच दिवस सहन केलं. पण एके दिवशी दुपारची वेळ होती आणि असाच प्रकार होऊ लागला. मास्टर सिन झाल्यानंतर कटींग सुरू झाले आणि मी कुणाला काही न बोलता मेअकमरुम मधे आले. तर तिथं कुलदिपजी वाचत बसले होते. मी रागरागाने फणफणत होते जाऊ दे, मला इथं कामच नाही करायचं. म्हणून मी मेअकप तर नव्हताच कुंकू काढले, केस सोडत होते.
तेव्हढ्यात कुलदीपजीनी मला आडवलं आणि म्हणाले काय झालं? मी म्हटलं किती ही मानहानी सहन करायची त्याला काही प्रमाण आहे की नाही? पण त्यांनी मला एक सांगितले. हे बघ, हे सगळ्यांच्या वाट्याला येतं. मी ही असाच नाही मोठा झालो, मला ही हे भोगावं लागलय. तरी सुध्दा सहन केलं. म्हणून आज मी इथवर पोहोचलो. टाक्याचा घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही. तसच आपण कलाकार ही मानहानी, अपमान, सहन केल्या शिवाय आपली हक्काची जागा मिळवू शकत नाही. पण एकदा का आपलं बस्तान बसलं की कुणी आपल्याला उठ म्हणण्याचं धाडस करु शकत नाही. तेंव्हा सबुरीने घे. मग पण थोडी शांत झाले आणि विचार केला. बरोबर आहे त्यांचं म्हणणं.
रागाच्या भरात आपण आपलच नुकसान करुन घेणार. त्यावेळी त्यांचं मी ऐकले म्हणून, आज मी माझं बस्तान इतकं घट्ट बसवलं आहे की, आज माझ्याशी बोलताना सगळे आदराने बोलतात. उठ म्हणायचं धाडस कोण करत नाही. त्यांची ही शिकवण मी कायम लक्षात ठेवली आणि पुढे ही ठेवीन. कुलदीपजी आज हयात नाहीत, पण त्यांनी दिलेला मंत्र कायम जिवंत राहील. अशी शिकवण देणाऱ्या कुलदीपजी यांना भावपूर्ण आदरांजली सह समर्पित.