नितेश तिवारी दिग्दर्शित रामायण या आगामी बॉलिवूड चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. २०२५ च्या दिवाळीत हा चित्रपट प्रदर्शित होईल असे बोलले जात आहे. चित्रपटाच्या शुटिंगची पूर्वतयारी झाली असून अनेक प्रसिद्ध चेहऱ्यांना चित्रपटात अभिनयाची संधी देण्यात आली आहे. एनीमल चित्रपटामुळे रणबीर कपूरच्या लोकप्रियतेत कमालीची वाढ झाली आहे. त्यामुळे या चित्रपटात त्याला प्रभू श्रीरामाची भूमिका साकारण्याची संधी मिळाली आहे. ही भूमिका निश्चित झाल्यानंतर सीता मातेची भूमिका कोण साकारणार यावर प्रश्न उपस्थित केला जात होता.
आलिया भट्टने सीता मातेची भूमिका साकारावी अशी विचारणा करण्यात आली होती. पण आलिया भट्ट संजय लीला भन्साळी यांच्या बैजू बावरा या चित्रपटात व्यस्त असल्याचे सांगितले जात होते. म्हणून मग सीता मातेच्या भूमिकेसाठी अभिनेत्री साई पल्लवीची निवड करण्यात आली आहे. या चित्रपटात रावणाची भूमिका दाक्षिणात्य सुपरस्टार यश निभावणार आहे. तर हनुमानाच्या भूमिकेसाठी सनी देओलची निवड केली असल्याचे सांगितले जात आहे. महत्वाचं म्हणजे रामायण चित्रपटात मराठमोळ्या चेहऱ्यांनाही संधी देण्यात आली आहे. रामायण या दूरदर्शनवरील मालिकेत भरतची भूमिका संजय जोग या मराठी अभिनेत्याने साकारली होती. तोच कित्ता आता रामायण चित्रपटात देखील गिरवला जाणार आहे.
कारण भरतच्या भूमिकेसाठी अभिनेता आदिनाथ कोठारेची निवड करण्यात आली आहे. आदीनाथ कोठारे याला या चित्रपटात पाहण्यासाठी त्याचे चाहते नक्कीच उत्सुक आहेत. याअगोदर आदिनाथने रणबीर कपूर सोबत ८३ या चित्रपटात एकत्रित काम केले होते. त्यामुळे रणबीर सोबत त्याला पुन्हा एकदा अभिनयाची संधी मिळत आहे. दरम्यान रणबीर कपूर प्रभू श्रीरामाची भूमिका साकारण्यासाठी खूपच उत्सुक आहे. नुकताच त्याने जिममध्ये मेहनत घेतानाचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. चित्रपटाच्या शुटिंगची पूर्वतयारी पाहून प्रेक्षकांनी आतापासूनच त्याबद्दल उत्सुकता दर्शवली आहे. लारा दत्ता, अरुण गोविल अशी भली मोठी स्टार कास्ट या चित्रपटात असणार आहे. त्यामुळे हा आणखी एक बॉलिवूडचा बिग बजेट चित्रपट ठरणार आहे.