झी मराठी वाहिनीने आपला घटलेला टीआरपी वाढवण्यासाठी कंबर कसली आहे. कारण गेल्या काही दिवसांत या वाहिनीने अनेक नव्या धाटणीच्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणल्या आहेत. शिवा आणि पारू या दोन नव्या मालिका लवकरच झी मराठी वाहिनीवर दाखल होत आहेत. त्यामुळे वाहिनीने जुन्या मालिकांना डच्चू दिलेला आहे. शिवा आणि पारू या मालिकेच्या प्रसारणाची वेळ झी वाहिनीने अजूनही गुलदस्त्यात ठेवलेली आहे. पण प्रेक्षकांना लवकरच याचा उलगडा होईल अशी आशा आहे. दरम्यान शिवा आणि पारू पाठोपाठ झी मराठी वाहिनी आणखी एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणत आहे.

वाहिनीच्या प्रेक्षकांना त्यामुळे एकामागून एक असे आश्चर्याचे धक्के मिळू लागले आहेत. आता या नवीन मालिकेचे फक्त नाव वाहिनीने जाहीर केलेले आहे. पुन्हा कर्तव्य आहे अशी एक कौटुंबिक ड्रामा असलेली मालिका प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. या मालिकेची प्रसारणाची वेळ वाहिनीने जाहीर केलेली नसली तरी एक चांगली मालिका पाहायला मिळो अशी आशा प्रेक्षकांनी व्यक्त केली आहे. दरम्यान पुन्हा कर्तव्य आहे ही मालिका हिंदी मालिकेचा रिमेक असल्याचे बोलले जाते. पुनर्विवाह ही हिंदी मालिका २०१२ साली प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. गेल्या वर्षी या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित करण्यात आला. कृतिका सेनगर आणि गुर्मीत चौधरी यांनी या मालिकेत प्रमुख भूमिका साकारली होती. हिंदी सृष्टीत या मालिकेला चांगली लोकप्रियता मिळाली होती.

विधुर नायक त्याला दोन अपत्ये आणि घटस्फोटित नायिका तिला एक अपत्य. या दोघांचे पुन्हा लग्न जुळवण्याची धडपड मालिकेत दाखवण्यात आली होती. असे मालिकेचे कथानक असलेली पुन्हा कर्तव्य आहे ही मालिका झी मराठी वाहिनी प्रेक्षकांच्या भेटीला आणत आहे. त्यामुळे मालिकेत कोणकोणत्या कलाकारांना अभिनयाची संधी मिळणार याची जास्त उत्सुकता आहे. पुन्हा कर्तव्य आहे या शिर्षकातच मालिकेचे संपूर्ण कथानक दडलेले आहे.तर ‘नवरी मिळे हिटलरला’ ही दुसरी नवी मालिका झी मराठी वाहिनीवर दाखल होत आहे. गुड्डन तुमसे ना हो पायेगा या मालिकेचा ती रिमेक असणार आहे. तूर्तास या दोन्ही शिर्षकानंतर मालिकेच्या पहिल्या प्रोमोची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. आणि या नव्या मालिकांमुळे कोणत्या दोन मालिकांना डच्चू मिळणार याचीही उत्सुकता लागून राहिली आहे.