माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत आजच्या भागात नेहा आणि यशचा साखरपुडा पार पडणार आहे. गेल्या दोन दिवसांपासून मालिकेत त्यांच्या साखरपुड्याची लगबग सुरू आहे. साखरपुड्याच्या निमित्ताने काकू यशसाठी सोन्याची अंगठी खरेदी करून आणतात. त्यावेळी मीनाक्षी तिथे येऊन ती अंगठी तिच्या ताब्यात घेते. परंतु मीनाक्षी कडून अंगठी गहाळ होते. आपल्यावर हे आरोप येऊ नयेत म्हणून ती ही अंगठीची डबी शेफाली कडे सुपूर्द करते. मात्र मिनाक्षीने दिलेल्या डबीत अंगठीच नसते हे शेफालीच्या लक्षात येते. त्यामुळे शेफाली खूप घाबरून जाते. साखरपुड्याच्या सोहळ्यात अडचण यायला नको म्हणून ती मिनाक्षीजवळ जाऊन तिच्यावर अंगठी हारवल्याचा आरोप करते.
मीनाक्षी हात झटकून सगळा आरोप शेफालीवर लावते, हा सगळा गोंधळ पाहून नेहा त्यांच्याकडे येते. यशला घालायची अंगठी गहाळ झाल्याने नेहा अस्वस्थ होते. तेवढ्यात यश तिथे येतो, नेहा त्याला घडलेला प्रकार सांगते. मात्र जवळच असलेली परी या दोघांचे बोलणे ऐकते आणि ‘अंगठी माझ्याजवळ आहे’ असे म्हणून नेहाला दिलासा देते. अर्थात परिजवळची अंगठी परीने स्वतःच्या हाताने एका चॉकलेटच्या रॅपरने ती ही अंगठी बनवते. तिची ही खास अंगठी पाहून यश खूपच खुश होतो आणि साखरपुड्याला मी परीने दिलेलीच अंगठी घालणार असे म्हणतो. हे पाहून नेहा आणि परी खूपच खुश होतात. नेहा यश एकमेकांना अंगठी घालणार तितक्यात शेफाली घरात जाऊन अंगठी शोधून आणते.
आता हरवलेली अंगठी सापडल्यानंतर यश दोन्ही अंगठ्या घालून नेहा आणि परीचे मन जिंकताना दिसतो. नेहा सोबत आता परिशी देखील माझं नातं जुळणार आहे त्यामुळे तो ह्या दोन्ही अंगठ्या बोटात घालतो. मालिकेत ह्या आठवड्यात नेहा आणि यशच्या लग्नाची लगबग पाहायला मिळणार आहे. साखरपुड्यानंतर नेहाची मेहेंदी आणि हळदीचा सोहळा रंगणार आहे. मालिकेत नेहा आणि यशच्या लग्नसोहळ्याचे चित्रीकरण नुकतेच पार पडले आहे. लग्नातला नेहा आणि यशचा लूक देखील आता प्रेक्षकांच्या समोर आला आहे. येत्या रविवारी १२ जून रोजी मालिकेचा दोन तासाचा विशेष भाग प्रसारित होत आहे. त्यामुळे त्यांच्या लग्न सोहळ्याची उत्सुकता निर्माण झाली आहे.