झी मराठी वाहिनीवरील एकमेव मालिका जी टीआरपीच्या स्पर्धेत टॉप ५ मध्ये स्थान निर्माण करू शकली आहे ती म्हणजे माझी तुझी रेशीमगाठ. प्रार्थना बेहरे, श्रेयस तळपदे, संकर्षण कऱ्हाडे, मानसी मागिकर, अजित केळकर, शीतल क्षीरसागर, मायरा वायकुळ यासारख्या कलाकारांनी ही मालिका आपल्या सहजसुंदर अभिनयाने रंगवली आहे. त्यामुळे मालिकेला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. अशातच आता परी नेहाचीच मुलगी असल्याचे आजोबांना सांगितले आहे. त्यामुळे गेल्या कित्येक दिवसांपासून नेहा आणि यशच्या लग्नाची वाट पाहणाऱ्या प्रेक्षकांनी निश्वास सोडला आहे. परी नेहाची मुलगी आहे हे आजोबा स्वीकारत नेहा आणि यशच्या लग्नाला परवानगी देत आहेत.
लवकरच मालिकेत यश आणि नेहाचा साखरपुडा पार पडणार आहे. या सोहळ्याचे चित्रीकरण नुकतेच पार पडले असून साखरपुड्यातील नेहाचा हिरव्या साडीतला लूक प्रेक्षकांना भावलेला पाहायला मिळतो आहे. हा साखरपुड्याचा सोहळा नेहाच्या घरी पार पडला आहे आणि आता लवकरच ते दोघे लग्न करणार असल्याने परी प्रेक्षकांना लग्नाचे आमंत्रण देताना दिसत आहे. आमच्या मामाच्या लग्नाला यायचं हं, आमच्या मावशीच्या लग्नाला यायचं हं असे ऐकण्यात येते. मात्र मालिकेतली परी ‘माझ्या आईच्या लग्नाला यायचं हं’ असे म्हणताना दिसत आहे. मालिकेतला हा संदेश समाजमाध्यमात देखील बदल घडवून आणेल अशी त्यामागची भावना आहे. ज्या सिंगल मदर असतील त्यांना पुन्हा जगण्याची एक नवी उमेद या संदेशातून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
त्यामुळे अशी प्रेरणादायी विचारसरणी असलेल्या या मालिकेचे प्रेक्षवर्गातून कौतुक केले जात आहे. साखरपुड्यानंतर नेहा आणि यश लवकरच लग्नबांधनात अडकणार आहे त्यामुळे त्यांच्या लग्नसोहळ्याची उत्सुकता निर्माण झाली आहे. मात्र लग्नसोहळ्यात सिम्मी काकू आडकाठी आणून कुठले नवे कटकारस्थान रचणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष आहे. किमान नेहा आणि यशचे हे लग्न सुखरूप पार पडावे अशी एक माफक अपेक्षा आहे. यश आणि नेहाच्या लग्नानंतर येत्या काही भागात प्रेक्षकांना समीर आणि शेफालीचे देखील लवकर लग्न व्हावे अशी मागणी करत आहेत. तसे संकेत देखील या मालिकेतून मिळत असल्याने त्यांच्याही लग्नाचा बार लवकरच उडालेला पाहायला मिळणार आहे.