माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेला लवकरच एक निर्णायक वळण मिळणार आहे. कारण इतके दिवस नेहा अनुष्का म्हणून तिची ओळख मिरवत आहे. मात्र यशच्या खुलास्या नंतर ती आता आपल्या पूर्वायुष्यातील घटना आठवण्याचा प्रयत्न करत आहे. आपल्याला आधीच्या गोष्टी काहीच कशा आठवत नाहीत, असे ती वारंवार म्हणत असते. हे पाहून जयंतीलाल मेहता आता तिला ती अनुष्काच असल्याचे पटवून सांगत आहेत. नेहा मेहता कुटुंबात आल्यामुळे आपल्या व्यवसायाची भरभराट झाली आहे. तिच्या येण्यामुळे घराला नवीन चैतन्य मिळालं आहे, त्यामुळे तिला आता या घरातून दूर पाठवायचं नाही असा पवित्राच त्यांनी घेतला आहे.
खरं तर नेहाचा अपघात होतो त्यावेळी जयंतीलालची पत्नी हॉस्पिटलमध्ये आजारी असतात. त्यांना बरं करण्यासाठी डॉक्टर अहोरात्र प्रयत्न करतात, मात्र नेहा तिथे येऊन त्यांच्या पत्नीच्या डोक्यावर हात ठेवते. तेव्हा जयंतीलालच्या पत्नीचे हृदयाचे ठोके नॉर्मल येतात आणि संकटातून सुखरूप बाहेर येतात. हे सर्व नेहामुळे शक्य झालेलं असतं म्हणून नेहा या घरातून जाऊ नये म्हणून ते तिच्यापासून सत्य लपवून ठेवत असतात. जयंतीलालचा हा हेतू नेहाला माहीत नसल्याने आणि ती या गोष्टींपासून अनभिज्ञ असल्याने ते सांगतील तसेच ती खरे मानत आली आहे. याबाबत आपल्याला काहीच कसे आठवत नाही या विचाराने ती गेल्या काही दिवसांपासून त्रस्त आहे. हे पाहून जयंतीलाल नेहाला आता सत्य सांगणार असल्याचे भासवत आहेत.
तू अनुष्काच आहेस आणि तू माझीच मुलगी आहेस हे तिला ते पटवून देत असतात. याबाबत एक घटना त्यांनी इथे अनुष्काला म्हणजेच नेहाला सांगितली. जयंती मेहताची पत्नी छाया आणि अनुष्काचा अपघात होतो या अपघातामुळे तुझी स्मृती गेलेली असते असे ते तिला म्हणतात. डॉक्टरांना मी तुझी स्मृती परत मिळवण्याबाबत विचारले तेव्हा त्यांनी तुझ्या मेंदूवर ताण येणार नाही असे काहीच न करण्याचा सल्ला दिला होता. पण तू माझीच मुलगी आहे हे जयंती मेहता अनुष्काला वारंवार सांगत असतात. मात्र अनुष्का म्हणजेच नेहाला यावर शंका येते. त्यात भर म्हणून की काय रितेश अनुष्काला पुन्हा काही आठवतंय का असे विचारतो, तेव्हा जयंतीलाल रितेश वर चिडतात.
तरीदेखील नेहा काहीतरी वेगळं घडतंय, अन चुकीचं घडतंय याची शंका तिच्या मनात उपस्थित झाली आहे. त्यामुळे लवकरच नेहाला आता आपल्या पूर्वायुष्यातील घटना आठवणार असल्याचे चित्र दिसत आहे. जयंतीलाल मेहता यांनी आपल्या पत्नीला देखील तिच्या बाबत खोटं सांगितलं आहे. नेहाचे कुणी नातेवाईक आहेत का याचा शोध घेणार असल्याचे त्यांनी त्यावेळी म्हटले होते. मात्र त्यांनी तसे काहीच केलेले नव्हते. नेहा मुळे आपली पत्नी वाचली आणि म्हणूनच त्यांनी तिच्यापासून सत्य लपवून ठेवलं आहे. पण लवकरच नेहाला यश आणि परिबद्दल सगळं काही समजणार आहे. या दिवसाची प्रेक्षक देखील आतुरतेने वाट पाहत आहेत.