चित्रपटाच्या कामाईची आकडेवारी पाहता महाराष्ट्रात वेड चित्रपटाने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलंय. वेड चित्रपटाला प्रदर्शित होऊन अवघे ८ दिवस पूर्ण झाले आहेत. पहिल्या आठवड्यातच चित्रपटाने आपला झालेला खर्च भरून काढलेला आहे. चित्रपटासाठी १५ कोटींचा खर्च करण्यात आला असे बोलले जाते, यात प्रमोशन आणि पोस्टरचा देखील खर्च गृहीत धरला आहे. पहिल्या आठवड्यात १५ कोटींचा टप्पा पार करत, ह्या आठवड्यात चित्रपटाने रेकॉर्डब्रेक कमाई करण्यास सुरुवात केलेली आहे. चित्रपटाच्या कमाईची नेमकी आकडेवारी जाणून घेतल्यावर तुम्हाला लक्षात येईल की, प्रेक्षकांनी रितेश आणि जेनेलियाला मराठी चित्रपटाचे नायक आणि नायिका म्हणून पसंती दर्शवली आहे.

चित्रपट प्रदर्शित झाला त्या दिवशी वेड चित्रपटाने २.२५ कोटींचा गल्ला बॉक्स ऑफिसवर जमवला होता. त्यानंतर शनिवारी ३.२५, रविवारी ४.५०, सोमवारी ३.०२, मंगळवारी २.६५, बुधवारी २.५५, गुरुवारी २.४५ असा एकूण २०.६७ कोटींचा पल्ला या चित्रपटाने गाठलेला होता. पहिल्या आठवड्याच्या तुलनेत दुसऱ्या आठवड्यात चित्रपटांना कमी प्रतिसाद मिळतो असे बोलले जाते. याचे अनेक दाखले देखील तुम्हाला पाहायला मिळतील. मात्र वेड चित्रपटाने हे मत सफसेल फेल ठरवलेले आहे. ह्या आठवड्यात तर चित्रपटाने रेकोर्ड ब्रेक कमाई करत शनिवारी आपलाच रेकॉर्ड मोडीत काढला आहे. शुक्रवारी या चित्रपटाने बॉक्सऑफिसवर २.५२ कोटींचा गल्ला आपल्या खात्यात जमवला. त्यानंतर काल शनिवारचा आकडा स्वतःचाच रेकॉर्ड मोडत एकाच दिवशी चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली होती.

या एकाच दिवसात चित्रपटाने ७९.७६ टक्के वाढ करून सगळ्यांना आश्चर्यचकित केलं आहे. काल तब्बल ४ कोटी ५३ लाखांची कमाई करत गेल्या आठवड्यातला रविवारचा रेकॉर्ड मोडीत काढला आहे. तर आज रविवारी सुद्धा वेड चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी चित्रपट गृहाबाहेर हाऊसफुल्लचे बोर्ड लावले आहेत. आतापर्यंत या चित्रपटाने तब्बल २७ कोटी ७२ लाखांची कमाई बॉक्सऑफिसवर जमवली आहे. वेड चित्रपटातील श्रावणीच्या भूमिकेला प्रेक्षकांनी पसंती दर्शवली आहे, तिथेच जिया शंकर हिचे सुद्धा कौतुक होत आहे. बऱ्याच जणांचा असा समज आहे की जिया शंकर ही अमराठी अभिनेत्री आहे, पण तसे मुळीच नाही. जिया शंकर ही मराठीच मुलगी आहे आणितिने साकारलेला हा पहिलाच मराठी चित्रपट आहे. मूळची मुंबईची असलेल्या जियाला हिंदी मालिका, दाक्षिणात्य चित्रपटांच्या माध्यमातून अभिनयाची संधी मिळत गेली.