मराठी बिग बॉसचा चौथा सिजन आज अखेरीस प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. रविवारी ८ जानेवारी रोजी मराठी बिग बॉसच्या चौथ्या सिजनचा ग्रँड फिनाले जोरदार चर्चेत राहिला. १०० दिवस बिग बॉसच्या घरात राहून सिजनचा विजेता कोण होणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. ही प्रतिक्षा आज संपलेली पाहायला मिळत आहे. अपूर्वा नेमळेकर ही सिजनची पहिली फायनलिस्ट बनली. प्रसाद जवादेमुळे अपूर्वा टास्क जिंकू शकली आणि त्याच्याचमुळे तिला फिनालेचे तिकीट मिळाले होते. तर अक्षय केळकर, किरण माने, अमृता धोंगडे, राखी सावंत हे चार सदस्य फायनलमध्ये पोहोचले. प्रसादला मात्र शेवटच्या एलिमीनेशन राउंडमधून बाहेर पडावे लागले.

दोन दिवसांपूर्वी बिग बॉसच्या घरातून बाहेर पडलेल्या सदस्यांनी पुन्हा एकदा घरात हजेरी लावली होती. त्यावेळी फायनलमध्ये पोहोचलेल्या सदस्यांचे अभिनंदन या सर्वांनी केले. आजच्या ग्रँड फिनालेमध्ये फायनलिस्ट सदस्यांचा आणि बाहेर पडलेल्या सदस्यांचा परफॉर्मन्स पुन्हा एकदा प्रेक्षकांना पाहायला मिळाला. यावेळी राखी सावंत हिने फायनलमधून बाजूला होऊन ९ लाखांची बॅग घेऊन हा शो सोडण्याचा निर्णय घेतला. ही ऑफर स्वीकारून राखीने अगदी योग्य केले असे प्रेक्षकांचे सुद्धा म्हणणे आहे. राखीने शोमध्ये खरे मनोरंजन केले होते तिच्याचमुळे शोचा टीआरपी वाढलेला होता. ती या शोची विजेती होवो अथवा न होवो याच्याशी तिला सुद्धा घेणेदेणे नव्हते. त्यामुळे तिच्या या निर्णयाचे सगळ्यांनी स्वागतच केले.

यानंतर अमृता धोंगडे बिग बॉसच्या घरातून बाहेर पडली. तिला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. इथे मात्र अपूर्वा नेमळेकर, किरण माने आणि अक्षय केळकर यांनी टॉप ३ मध्ये आपले नाव नोंदवले. त्यानंतर किरण माने यांना स्पर्धेतून बाहेर पडावे लागले. त्यांना तिसऱ्या क्रमांकवरच समाधान मानावे लागले आहे. अपूर्वा नेमळेकर आणि अक्षय केळकर या दोन टॉपच्या सर्धकांमध्ये कोण विजेता होणार याची उत्सुकता असतानाच अक्षय केळकरला फिनॉलेक्स पाईप कडून ५ लाखांचे बक्षीस मिळाले. कॅप्टन ऑफ द इयर म्हणून त्याला या बक्षिसाने नावाजले गेले. तर अक्षयने विजेते पदावर आपले नाव नोंदवलेले पाहायला मिळाले. अक्षयला विजयाच्या ट्रॉफीसोबत पू ना गाडगीळ यांच्याकडून १० लाखांचे बक्षीस आणि १५ लाख ५५ हजारांचा धनादेश देण्यात आला.