झी मराठी वाहिनीवरील माझी तुझी रेशीमगाठ ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. मालिका टीआरपीच्या स्पर्धेत आपले स्थान टिकवून ठेवत असतानाही, केवळ कथानक वाढू नये. आणि त्या कथेची मज्जा संपू नये या हेतूने मालिका संपवण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र मालिकेच्या चाहत्यांना अजूनही ही मालिका हवीहवीशी वाटत आहे. त्यांनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त करत ही मालिका चालू ठेवावी असे आवाहन केले. १७ सप्टेंबर रोजी माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित होत आहे. त्यानंतर १९ सप्टेंबर २०२२ पासून या मालिकेच्या जागी दार उघड बये ही नवी मालिका प्रसारित होणार आहे.
माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेचे शूटिंग नुकतेच पूर्ण करण्यात आले. यावेळी कलाकारांनी एकमेकांची भेट घेऊन तात्पुरत्या स्वरूपाचा भावनिक निरोप दिलेला पाहायला मिळतो आहे. संकर्षण कऱ्हाडे आणि श्रेयस तळपदे यांची या मालिकेमुळे प्रथमच भेट घडून आली. मालिकेच्या पहिल्या एपिसोडसाठी संकर्षण खूपच उत्सुक होता. मात्र श्रेयस खूप मोठा कलाकार आहे तो आपल्याशी जुळवून घेईल की नाही अशी पुसटशी शंका त्याच्या मनात घर करून होती. मात्र पहिल्याच भेटीत श्रेयस तळपदेचा दिलखुलास स्वभाव संकर्षणला त्याच्या अधिक जवळ घेऊन गेला. या दोघांची मालिकेत जशी घट्ट मैत्री बनली तसेच बॉंडिंग आता या मालिकेतून त्यांच्या खऱ्या मैत्रीत तयार झालेले आहे.
मैत्रीचे हे अतूट नाते कायम जपून राहील असा विश्वास त्यांनी प्रत्ययास आणून देणारी एक पोस्ट लिहिली आहे.
काल मालिकेच्या शेवटच्या सीनचे शूट करण्यात आले. समीर आणि यश चे अखेरचे शूटिंग म्हणत संकर्षणने श्रेयसला मिठी मारलेले काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ‘बाय बाय यश समीर, काल आम्ही यश आणि समीर म्हणुन “माझी तुझी रेशीमगाठ” मालिकेतला शेवटचा सीन शूट केला. मला माझ्या मित्राची, यशची, माझ्या पात्राची, समीरची आणि त्यांच्या अफ्फलातून मैत्रीची कायम आठवण येत राहील. ही दोस्ती तुटायची नाय. खूप बोलायचंय, सांगायचंय, सविस्तर लिहिनच. माझ्या कामांमधून मी तुम्हाला भेटत राहीनच.’ असा विश्वास त्याने यावेळी व्यक्त केला आहे. संकर्षणचा मालिकेतला प्रवास इथेच संपला आला तरी तू म्हणशील तसं हे त्याचं नाटक तुफान गाजत आहे.
या नाटकाचा २२५ वा प्रयोग पुण्यात पार पडणार आहे. हे नाटक पहायला नक्की या असे तो आवर्जून म्हणताना दिसत आहे. मालिकेत एकत्रित काम करत असताना कलाकारांमध्ये एक छान बॉंडिंग तयार होत असते. यश, समीर, नेहा, परी, शेफाली, आजोबा ही पात्र प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. त्यामुळे मालिका आटोपती घेतल्याने चाहत्यांनी नाराजी दर्शवली आहे. या कलाकारांसोबत प्रेक्षकांचेही एक भावनिक नाते आपोआप जोडले गेलेले असते. ही कलाकार मंडळी पुन्हा एकदा नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येवोत अशी एक माफक अपेक्षा आहे.