प्राजक्ता माळी आणि तेजस्विनी पंडित यांची मुख्य भूमिका असलेला ‘रानबाजार’ या वेबसिरीरीजचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. रानबाजार ही वेबसीरिज २० मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सचिन खेडेकर, मोहन आगाशे, मकरंद अनासपुरे, अभिजित पानसे सोबतच उर्मिला कोठारे आणि माधुरी पवार हे कलाकार दिसणार आहेत. टीझरमध्ये प्राजक्ता माळी आणि तेजस्वीनीचा बोल्ड अंदाज पाहून मराठी प्रेक्षकांनी मात्र आश्चर्यकारक प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. या वेबसीरिजमध्ये प्राजक्ता माळी प्रथमच इतकी बोल्ड भूमिका साकारताना दिसत आहे. त्यावरून प्राजक्ताला ट्रोल केले जाऊ लागले आहे.
आम्हाला तुला अशा भूमिकेत नाही बघायचं अशा संतप्त प्रतिक्रिया तिच्या विरोधात दिल्या जाऊ लागल्या. ट्रोलर्सच्या प्रतिक्रियेवर प्राजक्ता म्हणते की, महाराष्ट्र हे माझं कुटुंब आहे. कोणी मला मुलगी, बहीण, आयडॉल मानतंय त्यामुळे निश्चितच त्यांना हा टिझर मनाला लागला आहे. मी त्यांच्या भावना समजू शकते, मला त्याबद्दल आदर आहे. पण एक माणूस म्हणून मी एक वेगळी व्यक्ती आहे आणि मी एक कलाकार म्हणूनही वेगळी आहे. कलाकार म्हटलं की वेगवेगळ्या भूमिका करणं हे तुमचं काम आहे. त्यामुळे प्रेक्षक नाराज होणार याची मला जाणीव होती. कामाठीपुरा मधील एका सेक्सवर्करची माझी भूमिका आहे हे आता नुकत्याच आलेल्या ट्रेलरमधून प्रेक्षकांना उलगडले आहे.
ज्या खूप निगेटिव्ह कमेंट्स आलेल्या आहेत ते माझे फॅन्स नाहीयेत तशा कमेंट्सना मी इग्नोअर करते. जेव्हा मला या वेबसिरीजबाबत कळले त्यावेळी मी स्क्रिप्ट वाचलं आणि ही भूमिका तगडी आहे याची जाणीव झाली. मात्र ही भूमिका स्विकारण्याच्या आधी मी आईची रीतसर परवानगी मागितली होती. भूमिका अशी अशी आहे असे मी तिला सांगितले होते. तेव्हा आई म्हणाली होती की, ‘आलिया भट्ट जर काठियावाडी मध्ये करू शकते तर तू का नाही.’ असं तीचं मनापासून उत्तर होतं. तिचा मला पूर्ण पाठिंबा आहे. मी कलाकार म्हणून ती भूमिका वठवली आहे आणि कलाकारांचं तेच काम असतं समाजात अस्तित्वात असणाऱ्या विविध भूमिका साकारणं. टिझर पाहूनही आईने छान अशी प्रतिक्रिया दिली होती.
एका अभिनेत्रीच्या बाबतीत नाचणं, लाजनं, मुरडनं, हसणं यातच कितीतरी वर्षे निघून जातात.खूप कमी वेळा चांगल्या भूमिका तिच्या पदरात पडतात, की ज्याच्यात ती अभिनेत्री म्हणून स्वतःला सिद्ध करू शकेल. प्रेक्षक असं म्हणतात की मराठीतली ही सर्वात बेस्ट वेबसिरीज आहे, मी म्हणेन की हिंदुस्तानातली ही सर्वात बेस्ट सिरीज आहे. त्यामुळे या सिरीजमधल्या कुठल्याही भूमिकेत मला टाकलं असतं तरी मी ही सिरीज केली असती. प्राजक्ताने दिलेली प्रतिक्रिया आणि त्यावर तिच्या आईने दिलेले समर्थन ट्रोल करणाऱ्यांना विचारात पाडणारे आहे. एका कलाकाराच्या उत्तम अभिनयाचा आदर जाणत्या प्रेक्षकांनी नक्कीच करायला हवा.