झी मराठीवरील देवमाणूस या मालिकेला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. एका मागून एक येणाऱ्या ट्विस्टमुळे ही मालिका टीआरपीच्या बाबतीत लवकरच लीड घेताना दिसत आहे. अर्थात याला मालिकेच्या कलाकारांनी दिलेली साथ आणि त्यांचा उत्तम अभिनय प्रेक्षकांना देखील खूपच भावल्याने हे सर्व घडून आले आहे. आज मालिकेतील एसीपी दिव्या सिंगची भूमिका साकारणाऱ्या नेहा खान बद्दल माहीत नसलेल्या काही खास गोष्टी जाणून घेऊयात..
नेहा खानने देवमाणूस मालिकेअगोदर शिकारी, बॅड गर्ल, काळे धंदे, हाफ टूथ, गुरुकुल, बियॉन्ड बॉर्डर्स यासारख्या अनेक चित्रपटांत महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. पण ‘देवमाणूस’ मालिकेमुळे ती घराघरांत पोहचली आणि खऱ्या अर्थानं तिला खरी ओळख इथे मिळाली. एका मुलाखतीत नेहाने सांगितले होते की तिची आई मराठी, तर वडील मुस्लीम. दोघांनी प्रेमविवाह केल्यानं घरच्यांनी त्यांना स्वीकारलं नव्हतं. वडिलांची संपत्ती आईला मिळू नये यासाठी सावत्र आईने तिच्या आईवर हल्ला केला होता. या हल्ल्यात तिच्या आईच्या शरीरावर तब्बल ३७० टाके पडले होते. या हल्ल्यासाठी जबाबदार ठरवतील आणि आळ घेतील या भीतीनं तिचे वडिल देखील फरार झाले होते. या घटनेत आई गंभीररीत्या जखमी झाली, तिच्यावर उपचारासाठी नेहा आणि तिच्या भावाने लोकांकडून मदत घेऊन, पेपर विकून, दुसऱ्यांच्या घरची धुणीभांडी करून पैसे जमा केले.
आई आजारातून बरी झाली त्यावेळी तिने दुसऱ्यांच्या घरचं पडेल ते काम करण्याचे ठरवले. शिक्षणासाठी पुरेसे पैसे नसल्याने शिक्षण देखील अर्धवट सोडावे लागले होते, यादरम्यान एका स्टुडिओत जाऊन नेहाने आपले फोटो पोर्टफोलिओ करून घेतला. हे फोटो मी पेपरमध्ये छापतो असे तो फोटोग्राफर नेहाला म्हणाला. दुसऱ्याच दिवशी आपला सुंदर फोटो पेपरमध्ये छापल्याची बातमी आसपासच्या परिसरात कळली. तेव्हापासून आपण हिरोईन व्हायचं हे स्वप्न तिने मनाशी बाळगलं. तिच्या या ध्येयाला आईचा खंबीर पाठिंबा मिळाला मात्र याची खबर वडिलांना झाली तर ते त्याला विरोध करतील म्हणून वडिलांना न सांगताच ती मुंबईत दाखल व्हायची. रेल्वेस्थानकावरील वॉशरूममध्ये मेकअप करून ती ऑडिशनला जायची. या प्रवासात अनेक चांगले वाईट अनुभव तिला मिळाले होते. अनुपम खेर यांच्या ऍक्टिंग स्कुलमध्ये तिने अभिनयाचे सुरुवातीचे धडे गिरवले. तिथे अमरजीत यांनी नेहाला मोठी मदत केली. तिला चित्रपटात कामही मिळवून देण्याचे आश्वस्त केले, जिमी शेरगिल सोबत बॅड गर्ल चित्रपटात तिला पहिल्यांदा अभिनयाची संधी मिळाली.
शिकारी हा तिने साकारलेला मराठी चित्रपट यातील बोल्ड भूमिकेमुळे नेहाला चांगली प्रसिद्धी मिळाली. मात्र प्रथमच ती देवमाणूस मराठी मालिकेतून प्रेक्षकांसमोर आली ती एसीपी दिव्या सिंगच्या आगळ्या वेगळ्या भूमिकेतून. सुरुवातीला हे पात्र डॉक्टरच्या जाळ्यात अडकताना दिसले मात्र कालांतराने दिव्या सिंगमधील झालेला बदल डॉक्टर आणि डिम्पलच्या लग्नात सर्वांना अनुभवायला मिळाला. छोट्या पडद्यावरील भूमिकांमुळे प्रेक्षक आपल्याला लक्षात ठेवतात हेच नेहाच्याही बाबतीत घडले असे म्हणायला हरकत नाही. संघर्षातून वाट काढत मराठी सृष्टीत स्थिरस्थावर होणे हे भल्या भल्यांना अजूनही जमलेले नाही, मात्र नेहा खान याला अपवाद म्हणावी लागेल कारण अभिनयाची कुठलीही पार्श्वभूमी नसताना तिनं मिळवलेलं हे यश निश्चितच कौतुकास्पद म्हणावे लागेल..