नुकत्याच रिलीज झालेल्या शाहरुख खानच्या जवान चित्रपटात एका दलित शेतकऱ्याचा तो प्रसंग मन हेलावून टाकतो. हे पात्र साकारणाऱ्या कलाकाराने त्याच्या सहजसुंदर अभिनयाने सर्वांच्याच मनाचा ठाव घेतला. ही भूमिका साकारणाऱ्या कलाकाराचे मोठे कौतुक होत आहे. ओंकारदास माणिकपुरी असे या अभिनेत्याचे नाव आहे. मूळचा छत्तीसगडचा रहिवासी अभिनयाचे धडे गिरवण्यासाठी नाटककंपनीत दाखल झाला. छोट्या छोट्या मिळेल त्या भूमिका साकारणारा ओंकार पुढे बॉलिवूड चित्रपटात प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेईल याचा विचारही कोणी केला नव्हता.
ओंकारदासच्या या अभिनयाची दखल मराठी मालिका अभिनेते किरण माने यांनी घेतली आहे. ओंकारदासच्या कौतुकात त्यांनी एक खास पोस्ट लिहिली आहे. जवान मध्ये एका दलित शेतकर्याला छितपुट कर्जाच्या वसुलीसाठी त्याच्या बायको, मुलीसमोर आणि गांवासमोर नग्न करून मारहाण केली जाते. ट्रॅक्टर ओढून नेला जातो. तरीही तो रडणार्या बायकोवर खेकसतो, तोंड बंद ठेव. पोरीची परीक्षा आहे ना? रडणार्या मुलीला शांत करत, काही विशेष नाही गं त्यात. माझीच चूक होती. तू जा. पेपर दे नीट. असं म्हणत मुलीला परीक्षा देण्यासाठी पाठवतो आणि स्वत:ला गळफास लावून घेतो. यानंतर पिच्चरमध्ये शाहरूख आपल्याला भानावर आणतो. देशातल्या शेतकर्यांचं वास्तव सांगतो. नंतर पिच्चरभर तो अनेक रूपांत जलवा दाखवतो.
विजय सेतूपती आग ओकतो. नयनतारा लख्खपणे चमकते. दिपीका पदुकोन सुखावून जाते. अनेक अनेक कलाकार येऊन जातात. तरीही एवढ्या मोठ्या तगड्या,चकचकीत स्टारकास्टमध्ये या सिनमधला हा साधासुधा शेतकरी, त्याचा केविलवाणा तरीही स्वाभिमानी चेहरा प्रेक्षकांच्या मनामेंदूवर कोरला जातो, नीट लक्षात रहातो. एवढा प्रभावी अभिनय या अभिनेत्यानं केलाय. ओंकारदास माणिकपुरी असं या अभिनेत्याचं नांव. छत्तीसगढमधल्या एका छोट्या खेड्यातल्या गरीब शेतकर्याचा पोरगा. वडिलांच्या मृत्यूनंतर त्यानं गांवाकडच्या नाटक मंडलीत काम करायला सुरूवात केली, नाच्या म्हणून. उघड्या मैदानात होणार्या नाटकाला प्रेक्षक जमवण्यासाठी गाणी म्हणायची, जोक सांगायचे, मिमिक्री करायची, हे त्याचं काम. एक दिवस तो प्रख्यात नाट्य दिग्दर्शक हबीब तन्वीर यांच्या नजरेस पडला.
तिथून पुढं त्यानं मागं वळून नाय पाहिलं भावांनो. उत्तरेकडच्या अभिजात नाटकांमध्ये त्याचं नांव आज लै मानानं घेतलं जातं. यापूर्वी तो आमीर खानच्या पीपली लाईव्ह सिनेमातबी आपल्याला दिसला होता. आपल्याकडे गांवखेड्यांत तमाशातली वगनाट्यं, लोकनाट्यं, कलापथकं यात काम करणारे असे लै लै लै भन्नाट अभिनेते आहेत. ज्यांना योग्य दिग्दर्शकानं मार्गदर्शन केलं, एक संधी मिळाली तर ते त्याचं सोनं करतील. इरफान खान, नवाज, संजय मिश्रा, पंकज त्रिपाठी या उत्तरेकडच्या गांवातल्या पोरांनी जत्रेतल्या नाटकांपास्नं सुरूवात करून हे सिद्ध केलंय. ग्रामीण मातीतनं वर आलेल्या ओंकारदासला यापुढेही अशा अनेक संधी मिळोत. थिएटरचा पाया असलेले, अभिनयाला अतिशय गांभीर्यानं घेणारे असे पॅशनेट नट भारतीय सिनेमा समृद्ध करणार आहेत. गांवखेड्यातल्या प्रतिभावानांना प्रेरणा देणार आहेत. सलाम ओंकारदास कडकडीत सलाम, किरण माने.