सोनी मराठी वाहिनीवर अबोल प्रीतीची अजब कहाणी ही मालिका प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. मन उडू उडू झालं या मालिकेनंतर अजिंक्य राऊत पुन्हा एकदा प्रमुख भूमिकेत पाहायला मिळत आहे. तर जान्हवी तांबट हिला प्रथमच या मालिकेने नायिकेची भूमिका देऊ केली आहे. या मालिकेतील राजवीरची आजी खुपच खास आहे. कारण घरातूनच त्यांना अभिनयाचे बाळकडू मिळाले होते. या मालिकेत आजीचे पात्र साकारणाऱ्या अभिनेत्रीचे नाव आहे जान्हवी पणशीकर सिंग. जान्हवी पणशीकर या मराठीतील दिग्गज प्रभाकर पणशीकर यांची मुलगी आहे.

प्रभाकर पणशीकर यांनी भटाला दिली ओसरी, तो मी नव्हेच, इथे ओशाळला मृत्यू, अश्रूंची झाली फुले, धन्यवाद मिस्टर आनंद अशी नाटकं गाजवली आहेत. नाट्यसंपदा या नाट्यसंस्थेतून त्यांनी अनेक नाटकांची निर्मिती केली आहे. त्यातील कट्यार काळजात घुसली हे नाटक तुफान लोकप्रिय झाले होते. रघुनंदन, जान्हवी आणि तरंगिणी अशी प्रभाकर पणशीकर आणि विजया पणशीकर यांची तीन अपत्ये. त्यापैकी जान्हवी पणशीकर यांनी बालपणीच नाटकातून रंगभूमीवर प्रवेश केला. नाट्यसंपदाच्या बहुतेक नाटकात जान्हवी पणशीकर यांनी भूमिका साकारल्या. एका हिंदी नाटकात काम करत असताना हिंदी मालिका अभिनेते शक्ती सिंग यांच्याशी त्यांची भेट घडून आली. जान्हवी यांची हिंदी शक्ती सिंग यांच्यामुळे अधिक सुधारली होती.

नाटकाच्या दौऱ्यातच दोघांचेही प्रेम जुळले आणि त्यांनी लग्नगाठ बांधण्याचा निर्णय घेतला. लग्नानंतर मानसी आणि शिवानी ही दोन अपत्ये त्यांना झाली. मानसी सिंग मोहिले ही देखील अभिनेत्री आहे. तर शिवानी देखील हिंदी सृष्टीत कार्यरत आहे. शिवानीने स्क्रिप्ट सुपरवायझर आणि असिस्टंट डायरेक्टर म्हणून हिंदी सृष्टीत काम करत आहे. मानसी मोहिले हिने स्वामिनी, श्रीमंताघरची सून, काहे दिया परदेस अशा मालिकांमधून महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. दरम्यान जान्हवी पणशीकर यांनी हिंदी सृष्टीतही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. मुरांबा या मराठी मालिकेत त्या महत्वपूर्ण भूमिका साकारत होत्या. अबोल प्रीतीची अजब कहाणी या मालिकेत त्या प्रेमळ आजीची भूमिका साकारत आहेत. पणशीकर कुटुंबाच्या अभिनयाचा वारसा त्यांची मुलगी जान्हवी आणि नात मानसी या दोघी मायलेकी समर्थपणे चालवत आहेत.
