स्वरदा ठिगळे ही मराठी तसेच हिंदी मालिका अभिनेत्री आहे. सोनी मराठी वाहिनीवरील स्वराज्य सौदामिनी ताराराणी या मालिकेतून ती महाराणी ताराराणींच्या भूमिकेत दिसत आहे. स्वरदाने तिच्या करियरची सुरूवात मराठी मालिका सृष्टीतून केली होती. २०१३ साली तिने माझे मन तुझे झाले या मराठी मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते. या मालिकेत तिने शुभ्राची मुख्य भूमिका साकारली होती. त्यानंतर सावित्री देवी कॉलेज तसेच प्यार के पापड मालिकेतही ती झळकली होती. थोडं तुझं थोडं माझं, नागीण अशा मराठी चित्रपट आणि हिंदी मालिकेतून तिने आपल्या अभिनयाची छाप पाडली होती.
स्वराज्य सौदामिनी ताराराणी या मालिकेसाठी तिने ऑडिशन दिले होते. राज्यभरातून तब्बल ४०० ऑडिशनमधून स्वरदाची मुख्य भूमिकेसाठी निवड करण्यात आली होती त्यामुळे ही भूमिका निभावण्याची तिच्यावर खूप मोठी जबाबदारी होती. अर्थात मालिकेतील तिची भूमिका तिच्या सहजसुंदर अभिनयाने तितकीच उठावदार झालेली पाहायला मिळते. महत्वाचं म्हणजे महाराणी ताराराणी यांचे घोड्यावर स्वार असलेचे एक खास चित्र प्रत्यक्षात साकारण्याची जबाबदारी स्वरदाने समर्थपणे सांभाळली आणि यामागचे परिश्रम देखील कसे असतील हे फोटो पाहून लक्ष्यात येते. ह्याचेच कौतुक करणारी एक पोस्ट अभिनेते डॉ अमोल कोल्हे यांनी लिहिली आहे. त्यात त्यांनी स्वरदाचे कौतुक करताना म्हटले आहे की, एक कृती आणि शंकेची जागा ठाम विश्वासाने घेतली! स्वराज्य सौदामिनी ताराराणी मालिकेत महाराणी ताराराणी यांची भूमिका स्वरदा ठिगळे यांनी साकारण्याचा निर्णय झाला तरीही मन साशंक होतं कारण या मालिकेच्या निमित्ताने महाराणी ताराराणी साहेबांच्या पराक्रमी इतिहासाबाबत गेल्या ३०० वर्षांची उपेक्षा, मळभ दूर करण्याचं आव्हान समोर असणार आहे आणि म्हणूनच ती भूमिका साकारणारी अभिनेत्री सर्वस्व झोकून काम करणारी हवी हे स्वाभाविक आहे.
स्वार घोड्याच्या पाठीवर बसून घोडा दोन पायांवर उभा करणे ही प्रतिमा अनेक चित्र, पुतळे यांच्या माध्यमातून एक ऐतिहासिक वैशिष्ट्य झाली आहे. साहजिकच ऐतिहासिक चित्रपट, मालिका यात याची आवर्जून मागणी असते. परंतु अशा शूटिंगचा माझा वैयक्तिक अनुभव भीतीदायक होता. खाली पडलेला स्टंटमन आणि त्याच्या छातीवर पाय ठेवलेला घोडा हे चित्र अनेक वर्षे डोळ्यासमोरून जात नव्हतं. पुढे माझाही हाच प्रसंग शूट करताना गंभीर अपघात होता होता वाचला. म्हणूनच स्वरदाने हा स्टंट करण्याविषयी मी साशंक होतो. पण कलाकाराने भूमिकेला भिडायचं ठरवलं की यश आपोआप चालून येतं, याचा प्रत्यय हा स्टंट पाहिल्यावर येतं. स्वरदा ने घोडा दोन पायांवर लीलया उभा केला आणि डोळ्यासमोर रणरागिणी, स्वराज्य सौदामिनी ताराराणी साहेब उभ्या राहिल्या! आपलं कौतुक होतंय हे पाहून स्वरदाने देखील त्यांचे आभार मानले आहेत. माझ्यासाठी ही पाठीवर मिळालेली शाब्बासकीची थाप आहे, माझ्यासाठी हे खूप मोठं अचिव्हमेंट आहे. मी कष्ट करायला कधीच कमी पडणार नाही असे म्हणून दिलेल्या या संधीबद्दल तिने जगदंब क्रिएशन्सचे आभार मानले आहेत.