महेश मांजरेकर दिग्दर्शित वेडात मराठे वीर दौडले सात चित्रपटाचे शूटिंग कोल्हापूर येथे गेल्या काही दिवसांपासून सुरू झालेले आहे. शूटिंग निमित्त पन्हाळा गडावर काही घोडे आणण्यात आले होते. घोड्यांची देखभाल करण्यासाठी काही कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली होती. यातीलच एक कर्मचारी नागेश खोबरे हा तरुण १९ मार्च रोजी रात्री फोनवर बोलत असताना पन्हाळा गडाच्या एका तटबंदीवरून खाली कोसळला. नागेश १०० फूट खोल दरीत कोसळल्याने त्याच्या छातीला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्याला दोरीच्या साहाय्याने दरीतून काढण्यात आले होते. त्यानंतर नागेशला तातडीने सीपीआर इस्पितळात दाखल करण्यात आले होते.

मात्र जखम गंभीर स्वरूपाची असल्याने त्याला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले. नागेशवर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र २८ मार्च रोजी पहाटेच्या सुमारास देवाज्ञा झाली असल्याचे जाहीर केले. उपचारासाठी खाजगी इस्पितळात दाखल केले त्यावेळी उपचारासाठी लागणारा खर्च आयोजक करतील असे आश्वासन देण्यात आले होते. गेल्या ८ दिवसांपासून नागेशवर जो खर्च करण्यात आला त्याचे पैसे आयोजकांनी दिले नसल्याने नातेवाईकांनी संताप व्यक्त केला होता. जोपर्यंत उपचाराचे पैसे मिळत नाहीत तोपर्यंत नागेशचा देह ताब्यात घेणार नाही असा संतप्त ईशारा नातेवाईकांनी दिला होता. दरम्यान चित्रपटाचे नाव जाहीर केल्यानंतर महेश मांजरेकर यांना टीकाकारांना सामोरे जावे लागले होते. सत्या मांजरेकरला त्यांनी चित्रपटात प्रमुख भूमिका देऊ केली होती.

कलाकारांच्या एकंदरीत हावभाव वरून छत्रपतींचे मावळे असे होते का? असा संतप्त सवाल उपस्थित करण्यात येऊ लागला होता. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात करण्यात आली तेव्हा महेश मांजरेकर यांचा मुलगा दिसला नाही. त्यामुळे मांजरेकरांनी सत्याला या चित्रपटातून काढून टाकले की काय अशी चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे या चित्रपटात आता सिद्धार्थ जाधव आणि आरोह वेलणकर या कलाकारांना संधी देण्यात आली आहे. हार्दिक जोशी, जय दुधाने, उत्कर्ष शिंदे, आरोह वेलणकर, सिद्धार्थ जाधव, विशाल निकम, प्रवीण तरडे, विराट मडके हे कलाकार आता या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणार आहेत. दैदिप्यमान चित्रपटाचे महेश मांजरेकर यांच्या तालमीत या सर्वांचा जोरदार सराव आणि चित्रीकरण सुरु आहे.