२००४ साली इंडियन आयडॉल या लोकप्रिय रिऍलिटी शोची सुरुवात झाली होती. या पहिल्याच सिजनचा मराठमोळा गायक अभिजित सावंत हा स्पर्धक विजेता ठरला होता. गायक राहुल वैद्य हा देखील याच सिजनमधून प्रेक्षकांसमोर आला होता. त्यामुळे या मराठमोळ्या गायकांना खरी ओळख मिळाली आणि चित्रपटातील गाणी गाण्याची संधी मिळाली होती. हिंदी नंतर आता प्रथमच इंडियन आयडॉल मराठीमध्ये येणार म्हटल्यावर प्रेक्षकांची उत्सुकता देखील वाढली आहे. इंडियन आयडॉल मराठीत होणार असल्याने नव्या दमाच्या गायकांना आता मोठी संधी उपलब्ध होणार आहे.

सगळ्यात मोठा ग्रँड रिऍलिटी शो अशी ओळख मिळालेला मराठीतला इंडियन आयडॉल लवकरच सोनी मराठी वाहिनीवर दाखल होणार आहे. नुकताच या शोचा एक नवा आणि तितकाच दमदार प्रोमो प्रेक्षकांसमोर आला आहे. या प्रोमोमध्ये आपल्या गाण्यांनी प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावणारे अजय अतुल यांची जोडी पुन्हा एकदा परीक्षकांच्या भूमीकेत पाहायला मिळणार आहे. अजय अतुल यांच्या दमदार एंट्रीमुळे या रिऍलिटी शो ची मजा आणखीनच वाढणार हे निश्चित आहेच. त्यामुळे प्रेक्षक देखील ‘इंडियन आयडॉल मराठी’ सिजन १ ची आतुरतेने वाट पाहत आहेत. सोनी मराठी वाहिनीने आता नव्या दमाच्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणल्या आहेत. ज्ञानेश्वर माऊलींच्या जीवनावर प्रथमच या वाहिनीने प्रेक्षकांसमोर मालिका आणली आहे शिवाय याच वाहिनीच्या अजूनही बरसात आहे, महाराष्ट्राची हास्य जत्रा, स्वराज्यजननी जिजामाता या मालिकांना प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे.

आता नव्याने दाखल होत असलेला हा रिऍलिटी शो प्रेक्षक नक्कीच खेचून आणेल यात शंका नाही. काही दिवसांपुर्वीच हिंदी इंडियन आयडॉलचा १२ वा सिजन पार पडला. गायक पवनदीप राजन हा त्या सिजनचा विजेता ठरला होता. इंडियन आयडल १२ च्या विजेत्याला ट्रॉफी व्यतिरिक्त देखील अनेक बऱ्याच गोष्टी मिळतात. विजेत्याला २५ लाख रुपये बक्षीसाची रक्कम देण्यात आली, या व्यतिरिक्त एका संगीत कंपनीसोबत एक करार देखील केला जातो. मात्र मराठी इंडियन आयडॉलसाठी बक्षीस योजना काय केली आहे याचाही लवकरच उलगडा होईल. तुर्तास या रिऍलिटी शोमध्ये कोणकोणते स्पर्धक सहभागी होणार आहेत याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अर्थात अजय अतुल स्वतः त्यांची निवड करणार असल्याने ते दर्जेदार गायक असतील यात शंका नाही. अजय अतुल यांना इंडियन आयडॉल मराठी या नव्या रिऍलिटी शो निमित्त खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा…