आई कुठे काय करते या मालिकेत संजनाने देशमुखांचे घर बळकावले आहे. त्यामुळे आता अनिरुद्ध तिच्यावर खूप चिडला आहे. आपण तिच्याकडून हे घर परत घेऊ असं तो कांचनकडे बोलून दाखवतो. एकीकडे अनिरुद्ध आपलं घर पुन्हा मिळवण्यासाठी धडपडताना दिसत आहे. तर दुसरीकडे डॅशिंग शेखर संजनाला पुरता धारेवर धरताना दिसत आहे. संजना किती फसवी आहे हे शेखरला चांगलेच ठाऊक आहे. आणि म्हणूनच तो संजनाला देशमुखांचे घर परत देण्यासाठी तिला सांगत आहे. शेखर संजनाकडे पोलिसांना सोबत घेऊन येतो. तर पोलिसाला पाहून संजना पुरती घाबरून जाते.
मात्र संजना घरात गेल्यावर कांचन शेखरला याबाबत विचारते तेव्हा शेखर म्हणतो की तुम्हाला तर माहिती आहे ना मी कसली कामं करतो. हे पोलीस माझे मित्र आहेत. एका ठिकाणी माझा टेम्पो अडकलाय तो सोडवायचाय म्हणून मी यांना सोबत घेऊन आलोय तुम्ही टेन्शन घेऊ नका. शेखरचे बोलणे संपते न संपते तोच तिथे संजना दाखल होते. त्यावेळी मी पोलिसांना समजावलंय सुटलीस तू असे तिला सांगतो. मी आता निघतोय पण मी परत येणार आणि निळ्या गाडीतून तो तुला अटक करून घेऊन जाणार तुझी वरात निघणार. या भल्या माणसांना फसवून तू यांची जागा लुबाडलीस ना ती त्यांना परत कर. नाहीतर तुझ्यापेक्षा फ्रॉड तर मी आहे तुला तर चांगलंच माहीत आहे.
कधी जेलमध्ये जाशील ते तुला सुद्धा कळणार नाही. असे म्हणताच विमल तिथे येते आणि शेखरच्या या बोलण्यावर खुश होते. मी तुम्हाला पुरणपोळीचे जेवण खाऊ घालते फक्त तुम्ही जे बोललात ते करून दाखवा असे संजनाकडे पाहून म्हणते. तिथेच उभी असलेली ईशा मात्र शेखर अंकलच्या या डॅशिंग धिंगच्याक एंट्रीवर त्याला साउथचा हिरो असल्याचे म्हणते. शेखरच्या पात्रामुळे मालिकेला खरा रंग चढला आहे. त्याच्या केवळ असण्यानेच संजनाच्या कटकारस्थानाला आळा बसणार आहे हे मालिकेच्या प्रेक्षकांना माहीत आहे.
संजनाला कोणी तगडी टक्कर देणारा असेल तर तो शेखरच आहे आणि त्याचमुळे त्याची मालिकेत पुन्हा एकदा एन्ट्री करण्यात आली आहे. ही भूमिका साकारली आहे मयूर खांडगे या अभिनेत्याने. मयुरचा तगडा अभिनय शेखरच्या व्यक्तिरेखेला साजेसा आहे. येत्या काही दिवसातच संजना देशमुखांचे घर त्यांना परत करणार की कांचनसह सगळ्यांना घरातून हाकलून लावणार हे स्पष्ट होईल.