घटलेला टीआरपी वाढवण्यासाठी मालिकेमध्ये नवनवीन ट्विस्ट आणले जातात. त्यामुळे कथानक रंजक होण्यास मदत मिळते असेच काहीसे मराठी बिग बॉसच्या घरात देखील घडलेले आहे. मराठी बिग बॉसचा शो हा अपूर्वा नेमळेकर, किरण माने आणि विकास सावंत यांच्यामुळे चर्चेत राहिला. अर्थात अपूर्वाचा आरडाओरडा, अमृता धोंगडेचे रडणे प्रेक्षकांना नकोसे वाटल्याने शो कडे अनेकांनी पाठ फिरवली. मराठी बिग बॉसच्या चौथ्या सिजनचा टीआरपी वाढवण्यास घरातील सर्वच सदस्य असमर्थ ठरले. गेल्या आठवड्यात किरण माने यांना सिक्रेट रुम मध्ये ठेवण्यात आले होते. त्यावेळी शो ने टीआरपीच्या स्पर्धेत जवळपास ८ व्या क्रमांकावर स्थान पटकावलेले दिसले.

तरीही म्हणावा तसा प्रतिसाद न मिळाल्याने आयोजकांनी एक दोन नव्हे तर चक्क चार वाईल्डकार्ड एंट्रीची घोषणा केली. बिग बॉसच्या इतिहासात आजवर एक ते दोन वाईल्डकार्ड एन्ट्री करण्यात आल्या होत्या. मात्र आता प्रथमच चार नवीन सदस्यांनी ह्या घरात प्रवेश केलेला पाहायला मिळणार आहे. तिसऱ्या सिजनमधील विजेता विशाल निकम आणि त्याच सिजनमधली मीरा जगन्नाथ हिने बिग बॉसच्या घरात एन्ट्री केलेली आहे. यासोबतच बिग बॉसच्या दुसऱ्या सिजनचा सदस्य आरोह वेलणकर याने देखील घरात प्रवेश केलेला आहे. हिंदी बिग बॉसच्या टीआरपीचा आलेख उंचावणाऱ्या राखी सावंतने देखील घरात एन्ट्री केलेली पाहायला मिळणार आहे. हे चारही सदस्य चॅलेंजर्स म्हणून बिग बॉसच्या घरात दाखल झाली आहेत.

त्यामुळे हे शेवटपर्यंत बिग बॉसच्या घरात राहणार की एका आठवड्यासाठी बिग बॉसचा घटलेला टीआरपी वाढवणार हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल. तूर्तास राखी सावंत मराठी बिग बॉसच्या घरात प्रथमच आल्याने तिचे प्रेक्षकांनी स्वागत केले आहे. राखी आता बिग बॉसच्या घरात येऊन धुमाकूळ घालणार हे आता प्रेक्षकांच्याही लक्षात आले आहे. तिच्या येण्याने अपूर्वा नेमळेकरचा चेहरा मात्र खाली पडलेला दिसला. आपल्याला तोडीस तोड सदस्य मिळाल्याने राखी समोर आपला निभाव लागणार का? असा प्रश्न तिला पडला आहे. कारण राखी सावंत आपल्या पद्धतीने हवा तसा गेम खेळत असते. हिंदी बिग बॉसच्या घरातही तिने प्रेक्षकांचे अशाच पद्धतीने मनोरंजन केले होते. हिंदी बिग बॉसच्या पहिल्या सिजनमध्ये राखी झळकली होती.
त्यानंतर १४ व्या आणि १५ व्या सिजनसाठी तिला आमंत्रित केले होते. आताच्या १६ व्या सिजनसाठी तिच्या नावाची पुन्हा एकदा चर्चा पाहायला मिळाली होती. चक्क मराठी बिग बॉसने तिला आमंत्रण दिल्याने राखीचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. दोन दिवसांपूर्वी राखीचा वाढदिवस होता तिचा बॉयफ्रेंड आदिलने हा वाढदिवस मोठ्या थाटात साजरा केला होता. लवकरच एक धमाका करू असे मिडियासमोर सूचक इशारा त्याने दिला होता. हा धमाका म्हणजेच मराठी बिग बॉसच्या घरातील राखीची एन्ट्री हे आता सगळ्यांना समजले आहे. तिच्या येण्याने बिग बॉसचा टीआरपी आता वाढणार हे निश्चित झाले आहे.