माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत नुकतेच नेहाने यशला आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे. त्यामुळे आता मालिकेच्या चाहत्यांनी निश्वास टाकला आहे. एकीकडे नेहाने यशला लग्नासाठी होकार कळविल्याने जेसिकाची या मालिकेतून एक्झिट होणार आहे. काही काळापुरते जेसिकाचे पात्र मालिकेत दर्शविले होते. नेहाकडून प्रेमाची कबुली घेण्यासाठीच समीरने हा प्लॅन आखला होता. आणि तो सक्सेस देखील झालेला पाहायला मिळाला. जेसिका यशला फसवते हे नेहाला समजते आणि त्याच्यावरील असलेले प्रेम सर्वांसमोर जाहीर करते. त्या क्षणी यश नेहाला अंगठी घालताना दिसतो. आता लवकरच यश आणि नेहाचं लग्न व्हावे अशी मालिकेच्या प्रेक्षकांची ईच्छा आहे.
मात्र या मालिकेत एक मोठा ट्विस्ट आलेला पाहायला मिळतो आहे. परी आणि यशचे नाते आतापर्यंत मैत्रीचे आहे. परीचा बाबा तिला आणि तिच्या आईला सोडून गेला त्यामुळे तिला बाबांविषयी आत्मीयता नाही. मालिकेच्या नव्या प्रोमोमध्ये काका परीला यशची बाबा म्हणून ओळख करून देतात. त्यावेळी यश आपला बाबा नाही असे म्हणत ती यशला बाबा म्हणून स्वीकारण्यास नकार देते. मालिकेच्या पुढील भागात मालिकेचा हा ट्विस्ट प्रेक्षकांची उत्कंठा वाढवणारा ठरणार आहे. कारण बाबां विषयीची तेढ परीच्या बालमनावर रुजली आहे. त्यामुळे ती यशला सहजासहजी बाबा म्हणून स्वीकारणार नाही. त्यासाठी यशला परिची समजूत घालावी लागणार आहे. मुलगी आणि बाबा हे नातं परीला उमगल्यावर ती यशचा नक्की स्वीकार करेल.
त्यासाठी प्रेक्षकांना अजून थोडी वाट पाहावी लागणार आहे. बाप लेकीच्या ह्या नात्याचा जिव्हाळ्याचा विषय मालिकेचा दिग्दर्शक कसा हाताळतो याचीही उत्सुकता निर्माण झाली आहे. दरम्यान परीने यशला बाबा म्हणून स्वीकारले तरी देखील आणखी बरेचसे ट्विस्ट या मालिकेतून पाहायला मिळणार आहेत. अर्थात अजून आजोबांना परिबद्दल माहीत नसल्याने ते नेहा आणि यशच्या लग्नाला परवानगी देणार की नाही हे ही पाहावे लागेल. त्यानंतरही नेहाचा सोडून गेलेला नवरा त्यांच्या आयुष्यात पुन्हा येण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकामागून एक येणारे हे ट्विस्ट प्रेक्षकांचे निश्चितच मनोरंजन करणारे ठरणार आहेत.