झी मराठी वाहिनीवर काल १० डिसेंबर पासून ‘हे तर काहीच नाय’ ही विनोदी मालिका सुरू करण्यात आली आहे. या विनोदी शोचे सूत्रसंचालन अभिनेत्री अक्षया देवधर हिने सांभाळले आहे. तुझ्यात जीव रंगला मालिकेतून पाठक बाईच्या भूमिकेने अक्षयाला लोकप्रियता मिळाली होती. आता ती पुन्हा एकदा झी मराठी वाहिनीवरील मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. मालिकेच्या कालच्या भागात संदीप पाठक, अजितकुमार कोष्टी, सिद्धार्थ जाधव, विजय कदम, सुशांत शेलार या कलाकारांनी हजेरी लावली होती. अजितकुमार कोष्टी आणि संदीप पाठकच्या अफलातून स्टँडअप कॉमेडीने प्रेक्षकांची भरभरून दाद मिळवलेली दिसली. या मालिकेच्या सुरुवातीचे प्रोमो पाहून प्रेक्षकांनी हा शो फ्लॉप होणार अशी आशा व्यक्त केली होती.
याच प्रोमोमध्ये पूजा सावंत, पुष्कर श्रोत्री यांनी आपल्या विनोदाने प्रेक्षकांना हसवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यांनी केलेले विनोद हे फारसे मजेशीर, मनोरंजनात्मक नसल्याचे मत अनेकांनी सोशल मीडियावर व्यक्त केले होते. त्यामुळे ह्या शोला प्रेक्षक स्वीकारणार नाहीत असेच चित्र पाहायला मिळाले होते. मात्र प्रेक्षकांनी बांधलेला हा अंदाज आता सफसेल फेल ठरलेला पाहायला मिळतोय. अतुल परचुरे, केशर शिंदे, सोनाली कुलकर्णी, संजय मोने यासारखे नाटक आणि चित्रपट सुष्टीतील नावाजलेले कलाकार बोलवून मनोरंजन करण्याचा प्रयत्न आता प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. सारेगमप लिटिल चॅम्पसच्या रिऍलिटी शो नंतर झी मराठी वाहिनीने, हे तर काहीच नाय हा शो प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे. शुक्रवारी आणि शनिवारी हा शो प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. दोन दिवस या शोमध्ये वेगवेगळे कलाकार दाखल होणार आहेत आणि त्यातून प्रेक्षकांचे मनोरंजन केले जात आहे.
हा शो म्हणजे जवळपास एक स्टँडअप कॉमेडी शो सारखा आहे. आपल्याला आलेले अनुभव तसेच विनोदी किस्से सांगून हे कलाकार प्रेक्षकांना हसवत आहेत. संदीप पाठक एक उत्कृष्ट विनोदि कलाकार आहे. दिवंगत लक्ष्मणराव देशपांडे यांनी वऱ्हाड निघालय लंडनला हे गाजवलेलं एकपात्री नाटक सध्या संदीप पाठक साकारत आहे. हे नाटक संदीपच्या अभिनयाने देखील तुफान लोकप्रिय झालं आहे. संदीपने या शोमध्ये आपल्या बाईकचा एक किस्सा विनोदी ढंगात सादर केला होता. त्याचा हा किस्सा ऐकून प्रेक्षक मात्र तुफान लोटपोट होऊन हसत होते. तर सिध्दार्थ जाधवला त्याचे किस्से ऐकून आपलं हसू आवरत नव्हते. त्यामुळे हा शो नक्की हिट होणार अशी खात्री वाटत आहे, सकारात्मक स्वरूपाच्या प्रतिक्रिया देखील प्रेक्षकांनी देण्यास आता सुरुवात केली आहे.