माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत आजोबांनी यशला त्याच्या खोटं बोलण्यावरून माफ केले आहे. तर नेहाला देखील त्यांनी नातसून म्हणून स्वीकारले आहे. कालच्या भागात चौधरी कुटुंब नेहाच्या घरी जाऊन रीतसर कांदे पोह्याचा कार्यक्रम करण्यासाठी गेले होते. नेहाच्या बाजूने तिचा भाऊ येणार नसल्याने त्याची कमी समीरने भरून काढली. नेहाने आपल्या भावाला फोन केला त्यावेळी तो हजर राहू शकणार नाही असे नेहाला सांगतो. त्यावेळी नेहा नाराज झालेली पाहायला मिळते. आणि म्हणून समीर नेहाच्या बाजूने तिचा भाऊ बनून नवऱ्या मुलाची चौकशी करतो.
यश नेहमी मोठमोठ्या गाड्यांमधून विमानातून प्रवास करतो. त्यामुळे त्याला साधं चालता येतं की नाही कंपनी कशी सांभाळणार असे भन्नाट प्रश्न विचारतो. समीरचे असे वागणे पाहून कालच्या भागात प्रेक्षकांचे मात्र नक्कीच मनोरंजन झालेले पाहायला मिळाले होते. आता लवकरच मालिकेत नेहाच्या मेहेंदीचा आणि हळदीचा सोहळा पाहायला मिळणार आहे. या सोहळ्याचे चित्रीकरण काही दिवसांपूर्वीच सेटवर पार पडले होते. ह्या आठवड्यात प्रेक्षकांना हे सोहळे पाहता येणार आहेत. आज नेहा आणि यशच्या लग्नसोहळ्याचे चित्रीकरण पार पडले आहे. १२ जून रोजी एक तासाच्या विशेष भागात हा लग्न सोहळा प्रेक्षकांना टीव्हीवर पाहायला मिळणार आहे.
लग्नसोहळ्यासाठी नेहाने गुलाबी रंगाची नऊवारी नेसली आहे तर यश देखील गुलाबी रंगाच्या कुर्त्यात खुलून दिसतो आहे. नेहा आणि यशच्या लग्नसोहळ्यातील लूक एका व्हिडिओतून प्रेक्षकांच्या समोर आला आहे. या व्हिडिओत यश वाजतगाजत घोडीवर बसून लग्नाच्या मंडपात हजेरी लावताना पाहायला मिळतो आहे. तर त्याच्या मागोमाग चौधरी कुटुंबीय देखील नाचत नाचत मंडपात दाखल होत आहेत. प्रार्थना बेहरे हिच्यासाठी हा अनुभव खूप वेगळा आहे असे ती म्हणते. कारण खऱ्या लग्नात पण ती एवढी तयार नव्हती झाली. लग्नसोहळ्यात गुलाबी रंगाची थीम असणार हे जेव्हा प्रार्थनाला समजले त्यावेळी तिने पुसटशी शंका उपस्थित केली.
कारण लग्नात नवरी मुलीसाठी गुलाबी रंग ओके आहे. पण मुलासाठी हा रंग सूट होणार नाही असे तिने बोलून दाखवले होते. मात्र या रंगावर शिक्कामोर्तब झाला आणि यशचा लूक समोर आला. त्यावेळी श्रेयसला हा रंग खुलून दिसतोय यावर प्रार्थनाने निश्वास टाकला. नऊवारी साडी, दागिने आणि एवढा सगळा मेकअप पाहून प्रार्थना म्हणते की मी माझ्या लग्नात सुद्धा एवढी नटली नव्हते. माझी लग्नातली मेकअप आर्टिस्ट आणि या लग्नातली मेकअप आर्टिस्ट एकच आहे आणि तिने देखील हेच म्हटले आहे.