मऊ लागलं म्हणून कोपरानं खणणारी पात्र अनेक मालिकांमध्ये नाट्य निर्माण करत असतात. सध्या अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या तू तेव्हा तशी या मालिकेतील नायक सौरभ पटवर्धन याची वहिनी पुष्पवल्ली हिनेही असाच गळ टाकत पटवर्धनांचा सौरभच्या नावाने असलेला वाडा नवरा सचिनच्या नावावर लिहून घेतला आहे. घरात रामनवमीची पूजा सुरू असतानाच रंगलेला हा इमोशनल ड्रामा प्रेक्षकांनाही आवडला. आता वल्लीच्या गळाला लागलेल्या सौरभला याचा काय फटका बसणार ते पुढच्या काही भागात दिसेलच.
कॉलेज जीवनातलं अधुरं प्रेम जेव्हा चाळीशीनंतर पुन्हा समोर येतं तेव्हा जुन्या आठवणीही हव्याहव्याशा वाटतात. या वनलाइन स्टोरीवर छोट्या पडद्यावर आलेल्या तू तेव्हा तशी या मालिकेने प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे. सौरभ आणि अनामिका यांच्या अनोख्या प्रेमावर ही मालिका बेतलेली आहे. एकीकडे चाळीशीनंतरचं प्रेम आणि दुसरीकडे कौटुंबिक ड्रामा अशी ट्रीट ही मालिका प्रेक्षकांना देत आहे. सध्या या मालिकेत सौरभकडून वडिलोपार्जित वाडा भाऊ सचिनच्या नावे लिहून घेण्याचा सीन चांगलाच रंगला. या सीनला रामायणातील अध्यायाची जोड देत दिग्दर्शकाने कमाल केली.
घरात पूजेचे कीर्तन सुरू असताना श्रीरामाने जसे कोणताही विचार न करता आपले राज्य भरतच्या नावावर करून दिले. त्याप्रमाणे मालिकेतील सौरभने त्याच्या नावावर असलेला वाडा भाऊ सचिनच्या नावे एका क्षणात लिहून दिला. त्याचवेळी सौरभच्या घरी आलेल्या अनामिकेच्या नजरेस वल्ली आणि सौरभ आले. ज्यामध्ये सौरभ पूजेला लवकर खाली येण्यासाठी वल्लीची मनधरणी करत असल्याचे दृश्य अनामिकाला दिसले. आता यातून काही वेगळे गैरसमज होणार हे स्पष्ट झाल्याने पुढच्या काही भागात मालिका चांगलीच रंगणार असल्याचे दिसत आहे.