कलर्स मराठी वरील बिग बॉसच्या घरात नुकतेच १५ स्पर्धकांनी सहभाग दर्शवला आहे. अभिनय, राजकारण, गायन आणि कीर्तन क्षेत्रातील हे १५ स्पर्धक आता १०० दिवस एकत्रित राहून प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहेत. या शोमध्ये दोन स्पर्धक दाखल झाले आहेत जे अगोदर खऱ्या आयुष्यात नवरा बायको होते. मात्र काही वर्षातच त्यांचा घटस्फोट देखील झाला. हे दोन स्पर्धक आहे अभिनेत्री “स्नेहा वाघ” आणि अभिनेता “अविष्कार दारव्हेकर”.
अविष्कार दारव्हेकर याने २००४ साली आपल्या अभिनयाची कारकीर्द सुरू केली. दुर्वा, किरण कुलकर्णी vs किरण कुलकर्णी, मृत्यूपत्र, सुहासिनीची सत्वपरीक्षा, आई तुझा आशीर्वाद, देवा शप्पथ खोटं सांगेन अशा मालिका आणि चित्रपटातून त्याने महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. अभिनेत्री स्नेहा वाघ हिच्याशी अविष्कारचे लग्न झाले होते. परंतु काही वर्षातच घरगुती हिंसाचाराच्या प्रकरणावरून स्नेहा वाघने त्याच्यापासून घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. स्नेहा वाघ हिने वयाच्या १३ व्या वर्षापासुनच रंगभूमीवर अभिनयाची सुरुवात केली होती. अधुरी एक कहाणी, काटा रुते कुणाला या मालिका तिने गाजवल्या होत्या. मराठी मालिकेत काम करत असताना तिला हिंदी मालिकांमधून अभिनयाची संधी मिळत गेली. ज्योती, एक वीर की आरदास.. विरा, मेरे साईं, चंद्रगुप्त मौर्य, शेर ए पंजाब महाराजा रणजित सिंग या आणि अशा अनेक हिंदी मालिकेतून तिला काम मिळत गेले.
२०१५ साली स्नेहा वाघ पुन्हा एकदा विवाहबंधनात अडकली. इंटेरिअर डिझायनर असलेल्या अनुराग सोळंकी ह्याच्यासोबत तिने दुसऱ्यांदा संसार थाटला मात्र लग्नानंतर ८ महिन्यातच त्यांचा घटस्फोट झाला. दोन वेळा घटस्फोट झाल्यानंतर स्नेहा वाघने एकाकी राहणे पसंत केले. हिंदी मालिका साकारत असताना तिला आता पुन्हा मराठी सृष्टीत झळकण्याची संधी मिळाली आहे. अविष्कार दारव्हेकर आणि स्नेहा वाघ दोघेही बिग बॉसच्या घरात पुन्हा एकत्र दिसत आहेत. दोघेही इतक्या वर्षानंतर एकमेकांसमोर आल्याने ते अवघडलेल्या अवस्थेत दिसले. बिग बॉसच्या घरात या दोघांचे मैत्रीपूर्ण संबंध निर्माण होतील की वाद घडवून आणतील हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे.