सुमारे पाच दशकांच्या आपल्या प्रदीर्घ कारकीर्दीत अमिताभ बच्चन यांनी रसिकांवर अष्टपैलू अभिनयाने अधिराज्य गाजवले. जंजीर आणि दीवार मधील अँग्री यंग मॅन, आनंद आणि नमकहराम मधील भावूक नायक, शराबी मधील व्यसनी पण जॉली हिरो, कभी कभी मधील रोमँटिक अशा नानाविध भूमिका लीलया साकारणारा हा अष्टपैलू कलाकार बॉलिवूडचा महानायक बनला. अभिनयाखेरीज पार्श्वगायक, चित्रपटनिर्माते आणि टेलिव्हिजन कार्यक्रम निर्माते म्हणूनही बच्चन यांनी काम केले..

बॉलिवूडच्या प्रदीर्घ कारकिर्दीत अमिताभ बच्चन यांनी जंजीर, दीवार, नमक हलाल, शोले, शहेनशा, चेहरे, बदला, डॉन, सरकार, बागबान, पिंक, सिलसिला, अग्निपथ, खुदा गवाह, कालिया, भूतनाथ, यंत्रयाराना, कभी कभी, सुहाग, पिकू, आनंद, कभी खुशी कभी गम, गुलाबो सीताबो, पा या सारखी १९० हुन अधिक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले. त्यांनी वर्ष २०१३ मध्ये द ग्रेट गॅट्सबी या चित्रपटातून हॉलिवूडमध्ये देखील पदार्पण केले. ४ राष्ट्रीय पुरस्कार आणि १४ फिल्मफेअर पुरस्कार सह पदमश्री आणि पदमविभूषण पुरस्कारांचे ते मानकरी ठरले आहेत. १९८४ ते १९८७ या काळात ते लोकसभेसाठी निवडले गेले होते. अभिनयासोबतच बॉलीवूडमध्ये एक उत्कृष्ट सेन्स ऑफ ह्युमर असलेला हा अभिनेता ११ ऑक्टोबर १९४२ रोजी प्रयागराज उत्तर प्रदेश येथे जन्मला. हिंदी सुप्रसिद्ध कवी हरिवंशराय बच्चन आणि तेजी बच्चन यांचे सुपुत्र होत.

हरिवंश राय बच्चन यांच्या दोन मुलांपैकी अमिताभ मोठे, त्यांच्या भावाचे नाव अजिताभ. आईला रंगभूमीची आवड होती आणि त्यांना एका फिल्ममध्ये भूमिकाही देऊ करण्यात आली होती, मात्र त्यांनी त्याऐवजी घर सांभाळण्यास प्राधान्य दिले. मूळचे उत्तर प्रदेशातील राणीगंज येथील बच्चन परिवाराचे खरे आडनाव आहे श्रीवास्तव, तसे बच्चन हे त्यांचे साहित्यिक टोपण नाव. कौन बनेगा करोडपतीच्या झगझगीत मंचावर दमदार पावलं टाकीत मोठ्या आत्मविश्वासाने प्रवेश करणारा आपला लाडका महानायक आज ऐंशीव्या वर्षात पदार्पण करतो आहे. आजही खणखणीत आवाजाची उत्कृष्ट शरीरयष्टी आजच्या तरुण पिढीला लाजवेल अशीच आहे. हिंदी, इंग्रजी भाषांवर अमिताभ यांचा दांडगा अभ्यास आपल्या सुसंस्कृत व्यक्तिमत्वाने ते सहज समोरच्याला आपलेसे वाटतात. स्वकर्तृत्वावर लार्जर दॅन लाईफ झालेल्या या महानायकास वाढदिवसाच्या शतशः शुभेच्छा. तुम जियो हजारो साल, साल के दिन हो पचास हजार.
