वाढत्या महागाईने सर्व सामान्यांचे कंबरडे मोडले आहे. मग भाज्या, फळे, अन्नधान्य असो गॅस सिलेंडर असो वा आणखी काही; या सर्वांनी महागाईचा आता भडका उडाला आहे. सोनं खरेदी करणं हे तर सामान्यांच्या खिशाला न परवडणारेच आहे. अशातच गेल्या कित्येक दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या वाढीव किंमतीवरून सरकारला धारेवर धरले जात आहे मात्र तरीही त्यांच्या किमती वाढतच जाताना दिसत आहेत. विशेष म्हणजे रुपयांत होणारी वाढ कधी नव्हे ते पैशा पैशाने कमी केली जाते ही तर एक शोकांतिकाच म्हणावी लागेल.
या वाढत्या किमतींवरून अभिनेता सुबोध भावेने एक पोस्ट लिहिली आहे. त्याची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्याने लिहिलेल्या पोस्टवर अनेकांनी प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. सुबोध भावे या महागाईबद्दल नेमकं काय म्हणाला ते पाहुयात.. “सतत असं वाटायचं की या सोनं आणि चांदीचा माज कोणीतरी उतरवला पाहिजे, त्यांना त्यांच्या किंमतीमुळे आपण लैच भारी असं वाटायला लागलं होतं. दरवर्षी सण आला की त्यांचा रुबाब वाढायचा. पण आता नाही.. कारण आता पेट्रोल आणि डिझेल यांनी सोन्या, चांदीची मस्ती उतरवली. आता दागिने पण यांचेच करणार, बँकेत ठेव म्हणून पण हेच ठेवणार. स्वतः बरोबर अख्खा बाजारभाव वाढवण्याच यांचं कर्तृत्व अफाट आहे. हे दोन नवीन भारीतले दागिने आम्हाला दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद..”
सध्याच्या महागाई सारख्या गंभीर प्रश्नावर विनोदाची भन्नाट फोडणी दिल्याने सुबोधचे हे बोल नक्कीच विचार करायला भाग पाडतात. सुबोध भावे नुकताच झी मराठी वाहिनीच्या सारेगमप लिटिल चॅम्पसच्या शो मध्ये हजेरी लावताना दिसला होता. या आठवड्यात शोमध्ये स्पर्धकांनी लावणी गायल्या होत्या. ह्या कलेवर आजवर चित्रपटाच्या माध्यमातून खूप अन्याय झाला असल्याचे तो म्हणतो आणि या चित्रपट सृष्टीचा मी एक भाग आहे एसे म्हणून या कलेची मी मनापासून माफी मागतो असे तो यावेळी म्हणला होता.