अभिनेते मिलिंद गवळी हे आई कुठे काय करते या मालिकेत अनिरुद्धची भूमिका साकारत आहेत. लवकरच मालिकेतून अनिरुद्ध आणि संजना यांच्या लग्नाची लगबग प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. मिलिंद गवळी यांनी आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीला अनेक मराठी चित्रपटातून नायकाच्या भूमिका बजावलेल्या आहेत. त्यातील “काळ भैरव” या २००६ सालच्या चित्रपटातील एक आठवण त्यांनी सांगितली आहे. त्याचे एक खास कारण देखील आहे, या चित्रपटात त्यांचा मुलगा जो दाखवण्यात आला होता तो चक्क १४ वर्षांनी त्यांना भेटण्यासाठी रत्नागिरीहुन आई कुठे काय करते या मालिकेच्या सेटवर आला होता. या मुलाचे नाव आहे “समर्थ”. आई मुठे काय करते याच मालिकेची अभिनेत्री शीतल क्षीरसागर हिने त्यांची भेट घडवून आणली होती. समर्थ हा शीतल क्षीरसागर यांच्या नात्यातलाच असल्याने त्याने मिलिंद गवळी यांना भेटण्याची ईच्छा व्यक्त केली होती आणि त्याची ही ईच्छा आता पूर्ण देखील झाली आहे.

काल भैरव या चित्रपटात समर्थ काही महिन्यांचाच होता. या चित्रपटाचे शुटिंग कोल्हापूरला पार पडले होते. एका सीनमध्ये समर्थला सापासोबत खेळताना दाखवले आहे. त्या मुलाचे आई वडील दोघेही त्यावेळी सेटवर हजर होते तेव्हा चिमुरड्याच्या काळजीत असताना मिलिंद गवळी यांनी त्यांना प्रश्न विचारला होता की, तुम्हाला त्या सापाची भीती वाटत नाही? त्यावर त्या दोघांनी उत्तर दिले की, आम्ही सापाला खूपदा पकडले आहे त्यामुळे आम्ही सापाला खूप चांगलं ओळखतो… तो आमच्या मुलाला काहीही करणार नाही…आज इतक्या वर्षांनी हा समर्थ मला भेटण्यासाठी येणार म्हटल्यावर मी खूपच उत्सुक होतो…. मिलिंद गवळी यांनी चित्रपटातील त्यावेळचा समर्थ आणि आताचा समर्थ असे दोन्ही फोटो इंस्टाग्रामवरून शेअर केले आहेत. त्यासोबतच त्यांनी समर्थ चित्रपटावेळी सापासोबत कसा खेळत होता याचाही एक फोटो शेअर करताना दिसले. इतक्या वर्षांनी समर्थची भेट घडून आणल्याबद्दल त्यांनी अभिनेत्री शीतल क्षीरसागर हिचे आभार मानले आहेत.
