मालिकेचा टीआरपी वाढवायचा असेल तर त्या कथानकात अनेक ट्विस्ट आणले जातात. हे ट्विस्ट प्रेक्षकांना अपेक्षित नसले तरी त्यामुळे मालिकेला एक वेगळे वळण लागलेले दिसून येते. अर्थात या ट्विस्टमुळे कधी नव्या कलाकाराची एन्ट्री केली जाते. अथवा कोणाची तरी एक्झिट केली जाते. झी मराठी वरील माझी तुझी रेशीमगाठ मालिका एका वेगळ्याच ट्रॅकवर गेलेली पाहायला मिळणार आहे. मालिकेत मिथिला काकी प्रेग्नन्ट असल्याने चौधरी कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. यश आणि नेहा मध्येही आता सुखी संसाराचे वारे वाहू लागले आहेत. त्यांच्या या सुखी संसाराला आता गालबोट लागलेले पाहायला मिळणार आहे.
मालिकेत मिथिला काकू घाईगडबडीत जवळच असलेल्या टेबलावर धडकतात, त्यामुळे त्या खाली कोसळतात. अशातच मिथिला काकूंना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात येते, त्यात त्यांचे बाळ दगवल्याचे समजते. ही बाब सिम्मी काकू यशला फोन करून सांगतात. या बातमीने यश घाबरून जातो आणि गाडी चालवत असताना त्याचा हातातल्या स्टेरिंग वरचा ताबा सुटतो. यशबरोबर नेहा देखील त्या गाडीत बसलेली असते. गाडीचे दार उघडून नेहा दूरवर फेकली जाते. तर या अपघातात यशच्या डोक्याला मार लागतो आणि तो बेशुद्ध होतो. मालिकेतला हा धक्कादायक ट्विस्ट प्रेक्षकांना अजिबात अपेक्षित नसल्याने मालिका वेगळ्या ट्रॅकवर गेली असल्याचे प्रेक्षकांनी म्हटले आहे.
या अपघातामुळे चौधरी कुटुंबावर मात्र मोठं संकट कोसळलेलं पाहायला मिळत आहे. अपघातात यश किंवा नेहा आपली स्मृती गमावले अशी पुसटशी शंका उपस्थित केली जात आहे. त्यामुळे मालिका आता अधिक रंजक बनल्याचे दिसत आहे. अर्थात मालिकेचे कथानक हे गेल्या काही दिवसांपासून अगदीच मुळमुळीत वाटत होते. मालिकेत काहीतरी घडावे अशी प्रेक्षकांनी अपेक्षा केली होती. काही दिवसांपूर्वी असे काही घडत नसल्याने आणि मालिकेचे मूळ कथानक संपल्याने मालिका एक्झिट करण्यात येणार होती. परंतु झी मराठी वाहिनीची ही एकमेव मालिका टीआरपी गाठत असल्याने प्रेक्षकांनी ही मालिका पुन्हा सुरू करावी असा आग्रह धरला होता.
प्रेक्षकांच्या या मागणीचा विचार करूनच ही मालिका पुन्हा सुरू ठेवण्यात आली. मात्र असे असले तरी कथानक थांबल्याने आणि मालिकेच्या वेळेत बदला केल्याने प्रेक्षकांनी या मालिकेकडे पाठ फिरवली. टीआरपीच्या बाबतीत ५ व्या क्रमांकावर असलेली ही मालिका थेट ३० व्या क्रमांकावर पोहोचल्याने हा ट्विस्ट मालिकेत आणल्याचे दिसून येते. मात्र हा ट्विस्ट प्रेक्षकांच्या पचनी पडणार की नाही हे येत्या काही दिवसातच स्पष्ट होईल.