मालवणी भाषा सातासमुद्रापार नेण्याचे काम “मच्छिंद्र कांबळी” यांनी केले होते. एक उत्तम अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता तसेच लेखक असलेल्या मछिंद्र सरांचे ‘वस्त्रहरण’ हे गाजलेलं नाटक देशविदेशात तुफान लोकप्रिय झालं. मालवणी नटसम्राट अशी ओळख निर्माण करणाऱ्या मच्छिंद्र कांबळी यांचा आज १४ वा स्मृतिदिन आहे त्यानिमित्ताने त्यांच्या जीवनप्रवासबद्दलच्या काही खास गोष्टींचा आढावा जाणून घेऊयात…

मच्छिंद्र कांबळी हे मूळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कलेचा वारसा लाभलेल्या ‘रेवंडी’ गावचे. ४ एप्रिल १९४७ रोजी त्यांचा सर्वसाधारण कुटुंबात जन्म झाला. बालपणीच वडिलांचे छत्र हरवल्याने आईनेच त्यांचे पालनपोषण केले. लहानपणापासूनच मच्छिंद्र कांबळी यांनी कलेची आवड जोपासत असताना बॅक स्टेजला राहून पडदे ओढणे असो किंवा कपड्यांना इस्त्री करणे अशी मिळेल ती कामे त्यांनी स्वीकारली होती. पुढे नाटकांतून भूमिका साकारत असताना आपल्या अफलातून अभिनयाने त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकून घेतली. १९८२ साली ‘भद्रकाली’ या नावाने त्यानी स्वतःची नाट्य संस्था उभारली. त्यासाठी जवळ पुरेसे पैसे नसल्याने प्रसंगी त्यांनी पत्नीचे दागिने देखील गहाण ठेवले. भद्रकाली नाट्यसंस्थेतून त्यांनी मालवणी भाषिक अनेक विनोदी नाटकं प्रेक्षकांच्या भेटीला आणली. वस्त्रहरण हे पहिलं वहिलं मालवणी नाटक त्यांनी परदेशात पोहोचवलं होतं. ‘पांडगो इलो रे’, ‘घास रे रामा’, ‘माझा पती छत्रपती’, ‘फादर माझा गॉडफादर’, ‘केला तुका नी झाला माका’ अशी अफलातून मालवणी नाटकं त्यांनी प्रेक्षकांच्या भेटीला आणली.

नाटकांमधून भूमिका साकारत असताना मराठी चित्रपट आणि टीव्ही माध्यमातूनही त्यांच्या वाट्याला बहुतेकदा विनोदी भूमिकाच आल्या. अनेक नाटकांमधून अभिनेत्री संजीवनी जाधवसोबतची त्यांची केमिस्ट्री अगदी सुरेख जुळून आली होती. एक उत्तम अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता, लेखक अशा विविध भूमिका गाजवणाऱ्या मच्छिंद्र कांबळी यांनी राजकारणात देखील आपले नशीब आजमावले होते. काँग्रेस पक्षाकडून त्यांनी लोकसभेची निवडणूक लढवली होती मात्र या लढतीत शिवसेनेच्या सुरेश प्रभूंनी त्यांच्या विरोधात बाजी मारलेली पाहायला मिळाली. मालवणी नटसम्राट अशी ओळख निर्माण करणाऱ्या मच्छिंद्र कांबळी यांनी ३० सप्टेंबर २००७ रोजी या जगाचा निरोप घेतला त्यांच्या पश्चात त्यांचा मुलगा ‘प्रसाद कांबळी’ हे भद्रकाली नाट्य संस्थेची जबाबदारी सांभाळत आहेत. प्रसाद कांबळी यांनी भद्रकाली निर्मिती संस्थेअंतर्गत ‘संगीत देवबाभळी’ या गाजलेल्या नाटकाची निर्मिती केली आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे ते अध्यक्ष आहेत.