तुझ्यात जीव रंगला मालिकेतून राणा आणि अंजलीची जोडी प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. जवळपास चार वर्षाहून अधिक काळापासून या मालिकेने प्रेक्षकांचे मनोरंजन केले होते. त्यामुळे मालिकेतील सर्वच पात्र महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचले होते. या मालिकेतील अभिनेत्री लवकरच एक नव्या मालिकेत झळकणार आहे ही अभिनेत्री आहे गोदाक्का म्हणजेच अभिनेत्री छाया सांगावकर. लवकरच एका नव्या मालिकेतून छाया सांगावकर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.
सोमिल क्रिएशन प्रस्तुत आभाळाची माया ही नवी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेच्या चित्रीकरणास सुरुवात झाली असून यात छाया सांगावकर एका महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. तुझ्यात जीव रंगला या मालिकेतील गोदाक्काच्या भूमिकेमुळे छाया सांगावकर यांना प्रसिद्धी मिळाली होती मात्र या मालिकेअगोदर त्यांनी अनेक चित्रपटातून विविधांगी भूमिका साकारल्या आहेत हे बहुतेकांना माहीत नसावे. भालजी पेंढारकर यांच्या शाब्बास सूनबाई, बायको केली, झुंज एकाकी अशा चित्रपटातून त्या तगड्या भूमिकेत पाहायला मिळाल्या. या चित्रपटातून मधुकर तोरडमल, भाग्यश्री, अशोक सराफ यासारख्या प्रसिद्ध कलाकारांसोबत त्यांना काम करण्याची संधी मिळाली होती.
छाया सांगावकर या मूळच्या कोल्हापूरच्या त्यामुळे नाट्य सृष्टीत त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला होता. नाटक चित्रपट हा प्रवास सुरु असताना तुझ्यात जीव रंगला मालिकेमुळे त्यांना अधिकच प्रसिद्धी मिळाली. त्यांच्या नाट्य आणि सिने सृष्टीतील आजवरच्या योगदानाबद्दल त्यांना अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. एवढेच नाही तर गेल्या वर्षी अखिल भारतीय सिने वर्कर्स असोसिएशनच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदी त्यांची नेमणूक करण्यात आली होती. तुझ्यात जीव रंगला या मालिकेनंतर कोरी पाटी निर्मित ‘बदली’ या वेबसिरीजच्या माध्यमातून त्या प्रेक्षकांच्या समोर आल्या होत्या. आता लवकरच त्या आभाळाची माया या नव्या मालिकेत एका दमदार भूमिकेत दिसणार आहेत. छाया सांगावकर यांना नव्या मालिकेनिमित्त खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन…