झी मराठीवरील माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत परी नेहाची मुलगी आहे हे आजोबांना समजले आहे. आजोबा कोणाशीच बोलत नाहीत हे पाहून परीने आजोबांचा रुसवा एक चिठ्ठी लिहून घालवला आहे. ही चिठ्ठी वाचून आजोबा भावुक होतात आणि ते नेहाला नातसून करायला तयार होतात. आजोबांचा रुसवा गेल्यामुळे आता चौधरी कुटुंब नेहाच्या घरी कांदेपोह्यांच्या कार्यक्रमाला गेलेले पाहायला मिळणार आहेत. रीतसर कांदेपोह्यांचा कार्यक्रम पार पडल्यावर नेहा आणि यशचे धुमधडाक्यात लग्न होणार आहे. अर्थात या क्षणाची मालिकेचे प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. त्यामुळे हा क्षण कधी एकदा मालिकेत पाहायला मिळतोय याचीच चाहते वाट पहात आहेत.
एकीकडे ही आतुरता ताणून धरलेली असतानाच मालिकेत यश आणि नेहाच्या हळदीच्या सोहळ्याचे चित्रीकरण पार पडले आहे. नुकताच नेहाच्या आणि यशच्या मेहेंदीचा सोहळा संपन्न झाला असून मेहेंदी सोहळ्यातील परी, शेफाली आणि नेहाचा लूक समोर आला आहे. तर हळदीचा सोहळा आज संपन्न होत असल्याने मालिकेचे सततचे शूटिंग कलाकारांना थकवा देणारे ठरले आहे. शेफाली म्हणजेच काजल काटे हिने सततच्या शूटिंगमुळे डोळे थकल्यासारखे झाले आहेत अशी एक इंस्टा स्टोरी शेअर केली होती. सलग शूटिंगमुळे हा थकवा आता चेहऱ्यावर दिसू लागल्याचे काजलने आवर्जून सांगितले आहे. हळदीच्या सोहळ्यासाठी यशने नेहाची साडी सिलेक्ट केली आहे.
पिवळ्या साडीत नेहाचा हळदीचा लूक नुकताच समोर आला आहे. आता प्रतीक्षा आहे ती नेहा यशच्या ग्रँड वेडिंगची. तुला पाहते रे मालिकेत ईशा आणि विक्रांतच्या लग्नाचा सोहळा मोठ्या थाटात पार पडलेला पाहायला मिळाला होता. असेच ग्रँड वेडिंग माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत पाहायला मिळणार आहे. मालिकेची टीम सिल्वासा येथे पोहोचली आहे. या ठिकाणी नेहा आणि यशचे लग्न पार पडणार आहे. सिल्वासा हे दादरा आणि नगर हवेली या भारतातील केंद्रशासित प्रदेशाची राजधानी तसेच प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. जिथे निसर्ग आणि शांततेचा सुंदर संगम लाभलेला आहे.
सिल्वासा येथे आई कुठे काय करते या मालिकेचे शूटिंग पार पडले होते. त्यामुळे या ठिकाणची एक वेगळी ओळख मालिकेतून अनुभवायला मिळाली होती. असेच एक सुंदर डेस्टिनेशन वेडिंग म्हणून माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेला लाभणार आहे. त्यामुळे हे ग्रँड वेडिंग कशा प्रकारे प्रेक्षकांसमोर येणार याची अधिक उत्सुकता आहे. लवकरच नेहा आणि यशच्या लग्नसोहळ्याचे चित्रीकरण पार पडणार आहे. हा सोहळा पुढील काही भागात मालिकेत दाखवला जाणार आहे.