आपल्या निखळ विनोदी अभिनयाने महाराष्ट्राची हास्यजत्रा शोमधून प्रेक्षकांना खळखळून हसायला लावणारे अरुण कदम किती डाऊन टू अर्थ आहेत याचे दाखले अनेकजण देताना दिसतात. आगरी कोळी भाषेतील त्यांचे हटके अंदाजातले डायलॉग प्रेक्षकांमध्ये हास्याचे फवारे उडवतात. शरीराने त्यांची उंची कमी असली तरी अभिनयाची उंची गगनाला भिडणारी आहे म्हणूनच त्यांचे कौतुक करायला केदार शिंदे सुद्धा थकत नाही. महाराष्ट्र शाहीर चित्रपटानिमित्ताने केदार शिंदे, अंकुश चौधरी आणि सना शिंदे या कलाकारांसह महाराष्ट्राची हास्यजत्रा शोमध्ये गेले होते. शोमधल्या कलाकारांनी प्रहसनातून विनोदाचे षटकार उडवत केदार, अंकुशला पोट धरून हसायला भाग पाडले.
यावेळी केदार शिंदे यांनी अरुण कदम यांचे कौतुक केले आहे. अरुण सोबत झालेली पहिली ओळख आणि कठीण काळात केलेली मदत, याचे किस्से सांगताना केदार म्हणतात की, बरेच दिवस झाले या आमच्या मित्राविषयी लाडका दादूस अरूण विषयी लिहायचं होतं. पण जमलंच नाही. महाराष्ट्र शाहीरच्या प्रमोशनसाठी महाराष्ट्राची हास्यजत्रा मध्ये गेलो होतो. त्यावेळेच्या हा खास फोटो. अरूण आणि माझी मैत्री १९९० पासून. माझ्या अनंत सुखदुःखात तो महत्वपूर्ण भूमिकेत होता. आमच्या सगळ्यांमध्ये लवकर सेटेल होणारा, घसघशीत कमाई करणारा पहिला अरूणच. आर्थिक विवंचना असल्यावर हातात पैसे ठेवणारा अरूणच.
कित्येक दिवस मी त्याच्या बीएमसी ॲाफिसात काढल्या आहेत. त्याच्या जीवावर पोट भरलं आहे. आमच्यात वयाने खुप मोठा पण, त्याची मस्करी करताना ते कधीच डोक्यात येत नाही. गण गवळण बतावणी आम्ही दोघं लोकधारामधे सादर करायचो. त्याच्या डोळ्यात दिसायचं की, पुढचं वाक्य तो विसरला आहे. पण अविर्भाव असा असायचा की, समोरचा वाक्य विसरला आहे. आता आम्ही एकत्र फार काम करत नाही. पण त्याची प्रगती पाहून अभिमान वाटतो. आत्ताच्या पिढीतील मुलांसोबत तो त्याच ऊर्जेने काम करतो, हे पाहून मन भरून येतं. खुप शुभेच्छा अरूण. आयुष्यात मोठी झालेली मराठी सृष्टीतील कलाकार मंडळी आजही आपले पाय जमिनीवर घट्ट रोवून आहेत हे आजही अशा प्रसंगातून नक्कीच जाणवतं.