आपल्यासोबतचे कलाकार मोठी झेप घेऊन यशाचे शिखर गाठतात तेव्हा त्यांचे कौतुक क्वचितच कोणी केलेले पाहायला मिळते. सुरुवातीला स्ट्रगलच्या काळात प्रतिस्पर्धी बनलेल्या कलाकारांना पुढे जाताना पाहून कुशल बद्रिके मात्र पुरता गहिवरून गेलेला होता. लवकरच झी मराठी वाहिनीवर ‘फिल्मफेअर अवॉर्ड मराठी २०२१’ हा पुरस्कार सोहळा रंगणार आहे. या सोहळ्याचे चित्रीकरण नुकतेच पार पडले आहे. ३ एप्रिल रोजी संध्याकाळी ७ वाजता प्रेक्षकांना हा सोहळा पाहता येणार आहे. सिद्धार्थ जाधव आणि अमेय वाघ यांनी या सोहळ्याचे सूत्रसंचालन केले आहे. स्मिता जयकर आणि कुशल बद्रिके यांच्या हस्ते सिध्दार्थला धुरळा चित्रपटातील त्याच्या भूमिकेसाठी उत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार देण्यात आला.
हा पुरस्कार स्वीकारताना सिध्दार्थला आपले अश्रू अनावर झाले ते पाहून कुशल बद्रिकेने सिद्धार्थ सोबतच्या आठवणींना उजाळा दिला. कुशलने यावेळी सिध्दार्थच्या यशाचे तोंडभरून कौतुक केले. स्ट्रगलच्या काळात सिध्दार्थने मला मोलाची संधी मिळवून दिली होती. याची आठवण तो या मंचावर काढताना दिसला. ही आठवण सांगत असताना मात्र त्याला आपले अश्रू अनावर झालेले दिसले. कुशलच्या हस्ते सिध्दार्थला पुरस्कार दिला त्यावेळी कुशल म्हणतो की, एका स्पर्धेत अचानक सिद्धू आला छोटं मोठं काम करत होता. तेव्हा मी हौशी रंगभूमीवर काम करत होतो. सिध्याची एन्ट्री झाली त्यावेळी मी असं म्हटलं होतं की हे साले कमर्शियल आर्टिस्ट येतात आणि बक्षिसं घेऊन जातात. आणि कसं कोण जाणे त्या स्पर्धेत द्वितीय क्रमांक सिद्धार्थ जाधवचा आला.
आणि प्रथम क्रमांक कुशल बद्रिकेचा आला. तिथे सिध्याने मला विचारलं की, नाटकामध्ये काम करशील का? आणि माझं पाहिलं कमर्शियल नाटक आलं ‘राम भरोसे’. तिथून माझा प्रवास सुरु झाला. आज या रंगमंचावरती सिध्दार्थचा पहिला नंबर आला असं मी म्हणेन आणि ते सर्कल आज पूर्ण झालं. कुशलच्या ह्या वाक्याला उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला मात्र ह्यावेळी हे कौतुकाचे शब्द बोलताना कुशलला आपले अश्रू अनावर झालेले पाहायला मिळाले. ह्या कौतुकाच्या थापेवर सिद्धार्थ म्हणतो की, थँक यु फिल्मफेअर मला असं वाटतं की स्वप्न पाहिली की ती पूर्ण होतात आणि ती पूर्ण होण्यासाठी असे मित्र लागतात. प्रथमच फिल्मफेअर हा पुरस्कार सोहळा मराठी मध्ये रंगणार असल्याने या सोहळ्याची उत्सुकता प्रेक्षकांना आहे.
या पुरस्कार सोहळ्यात गायिका अपेक्षा दांडेकर हिला झिम्मा चित्रपटातील माझे गाव या गाण्यासाठी उत्कृष्ट गायिका म्हणून पुरस्कार मिळाला आहे. सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून झिम्मा आणि कारखाणीसांची वारी या दोन चित्रपटाला हा पुरस्कार विभागून देण्यात आला आहे. तर सहाय्यक अभिनेत्री म्हणून धुरळा चित्रपटासाठी सोनाली कुलकर्णी आणि कारखाणीसांची वारी चित्रपटासाठी गीतांजली कुलकर्णी यांना देण्यात आला आहे. धुरळा चित्रपटासाठी सई ताम्हणकर आणि जून चित्रपटासाठी नेहा पेंडसे यांना सर्वोत्कृष्ट नायिकेचा पुरस्कार मिळाला आहे. तर अंकुश चौधरीला धुरळा चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट नायकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.