ज्ञानेश्वर माऊलींच्या ७२५ व्या संजीवन समाधी वर्षपूर्तीचे औचित्य साधून सोनी मराठी वाहिनीवर दिव्यत्वाचे दर्शन देणारी एक नवी मालिका दाखल होत आहे. येत्या २७ सप्टेंबर पासून सोमवार ते शनिवार संध्याकाळी ७ वाजता “ज्ञानेश्वर माऊली” ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. दिग्पाल लांजेकर आणि चिन्मय मांडलेकर यांची निर्मिती असलेल्या या या मालिकेचे दिग्दर्शन रघुनंदन बर्वे करत आहेत. तर संवाद लेखन नितीन वाघ आणि अनघा काकडे यांनी केले असून पार्श्वसंगीताची धुरा केदार दिवेकर निभावत आहे.
फत्तेशीकस्त, फर्जंद, पावनखिंड या चित्रपटाच्या यशानंतर दिग्पाल लांजेकर यांनी माऊलींवर मालिका बनवण्याची ईच्छा सोनी वाहिनीकडे व्यक्त केली होती. गो नी दांडेकर यांच्या ‘मोगरा फुलला’ या कादंबरीचा आधार घेऊन आणि त्यावर बरीच वर्षे अभ्यास करून ही मालिका आता प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.ज्ञानेश्वर माऊली या मालिकेत ज्ञानेश्वरांची प्रमुख भूमिका साकारणाऱ्या कलाकाराचे नाव आहे “वरूण भागवत”. तब्बल २५ कलाकारांच्या ऑडिशनमधून वरूणची निवड ज्ञानेश्वरांच्या भूमिकेसाठी करण्यात आली आहे. वरून भागवत हा रंगभूमीवरचा कलाकार आहे. वरूण मेकॅनिकल इंजिनिअर असून एमबीएचे शिक्षण त्याने घेतले आहे. कॉलेजमध्ये असताना अनेक नाट्यस्पर्धेत त्याने सहभाग दर्शवला आहे. ‘अनबीटेबल’ या नाटकाचे लेखन, दिग्दर्शन आणि अभिनयही त्याने साकारला होता. याशिवाय बालकलाकार म्हणून त्याने २०१० साली ‘अल्लाह के बंदे’ या हिंदी चित्रपटात काम केले होते.
सह्याद्री वाहिनीवरील ‘मोरया गोसावी’ मालिकेतून तो बालशिवाजींच्या भूमिकेत झळकला होता. त्यामुळे अभिनयाचा दांडगा अनुभव असलेला वरूण ज्ञानेश्वर माऊलींची भूमिका आपल्या अभिनयातून चांगलीच वठवेल यात शंका नाही. या मालिकेत मुक्ताबाईंची भूमिका अभिनेत्री “सानिका जोशी” साकारताना दिसणार आहे. सानिकाची ही पहिलीच टीव्ही मालिका असली तरी तिचा निरागसपणा मुक्ता बाईंच्या व्यक्तिरेखेतून प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. ज्ञानेश्वर माऊली यांच्या जीवनावर प्रथमच मालिका तयार होत असल्याने प्रेक्षकांमध्ये या मालिकेबाबत कमालीची उत्सुकता आहे. तुर्तास ज्ञानेश्वर माऊली या मालिकेनिमित्त सर्वच कलाकारांना शुभेच्छा.