अभिनेत्री स्नेहा वाघचे अविष्कार दारव्हेकर सोबत लग्न झाले होते. परंतु काही वर्षात घरगुती हिंसाचाराच्या प्रकरणावरून स्नेहाने त्याच्यापासून घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. स्नेहाने शाळेत असताना रंगभूमीवर अभिनयाची सुरुवात केली होती. ज्योती, अधुरी एक कहाणी, काटा रुते कुणाला, चंद्रगुप्त मौर्य, मेरे साई या मालिका तिने गाजवल्या होत्या. मराठी मालिकेत काम करत असताना तिला हिंदी मालिकांमधून अभिनयाची संधी मिळत गेली. ज्योती, एक वीर की आरदास विरा, बिट्टी बिजनेस वाली, कहत हनुमान जय सिया राम, शेर ए पंजाब महाराजा रणजित सिंग अशा अनेक हिंदी मालिकेतून तिला काम मिळाले.

२०१५ साली स्नेहा वाघ पुन्हा एकदा विवाहबंधनात अडकली होती. इंटेरिअर डिझायनर असलेल्या अनुराग सोलंकी ह्याच्यासोबत तिने दुसऱ्यांदा संसार थाटला, मात्र लग्नानंतर काही महिन्यातच त्यांचा घटस्फोट झाला. दोन वेळा घटस्फोट झाल्यानंतर स्नेहा वाघने एकाकी राहणे पसंत केले. हिंदी मालिका साकारत असताना तिला आता पुन्हा मराठी सृष्टीत झळकण्याची बिग बॉस मराठी मध्ये संधी मिळाली.अविष्कार दारव्हेकर आणि स्नेहा वाघ दोघेही बिग बॉसच्या घरात पुन्हा एकत्र दिसले. बिग बॉस मराठीच्या यंदाच्या सीझनमध्ये ती सुरुवातीपासूनच चर्चेत होती. सुरुवातीला ती तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत राहिली. दोघेही इतक्या वर्षानंतर एकमेकांसमोर काहीसे मैत्रीपूर्ण संबंध निर्माण झाले, घरात स्नेहाचा वाढदिवस झाला तेव्हा अविष्कारने तिला शुभेच्छाही दिल्या. शोमध्ये एकदा सुरेखा कुडची सोबत बोलताना स्नेहानं आविष्कार कसा मारहाण करायचा हे बोलून दाखवलं होतं. हा मुद्दा प्रचंड चर्चेत आला होता. स्नेहा म्हणाली, “एक वेळ अशी होती की, मला घरी जायची देखील भीती वाटायची. शूटिंग वर जाताना माझी अर्धी शुद्ध हरपलेली असायची. अशावेळी सेटवरचे कोस्टार मला खूप सांभाळून घ्यायचे. अनेकदा शूट करताना मला मारहाण झालेल्या खुणा सर्वांना दिसायच्या.”

पण अविष्काराच्या एक्झिट मुळे या सर्व गोष्टींना पूर्णविराम मिळाला. त्यांनतर जय दुधाणे सोबतची मैत्री सोशल मीडियावर चर्चेचे कारण ठरत होते. बिग बॉस मराठी सिझन ३ मधील तिचा प्रवास फारसा रंजक नसल्याने प्रेक्षकांची विशेष पसंती तिला मिळविता आली नाही. टास्क दरम्यान झालेले वाद आणिअति केलेल्या काही गोष्टींनी तिला प्रसिद्धी मिळण्याऐवजी बऱ्याचवेळा ट्रोलला सामोरे जावे लागले. बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतपर स्नेहाने सोशल मीडियावर तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. “बिग बॉस मराठीचा प्रवास खूप सुंदर होता. त्यातून खूप काही नवीन शिकायला मिळालं. या प्रवासात माझ्या चांगल्या-वाईट प्रसंगी तुम्ही नेहमीच माझ्यासोबत ताकदीने उभे राहिलात. तुम्ही दिलेलं प्रेम मी कधीच विसरणार नाही, नेहमीच तुमची आभारी राहीन.”