बिग बॉस मराठी सीझन चारच्या चौथ्या आठवड्याचा कॅप्टन अक्षय केळकर ठरला. धुवून टाक या टास्कमध्ये त्याने विकासवर बाजी मारली. यापूर्वीही अक्षयला कॅप्टनपद मिळालं आहे. अक्षय विरूध्द विकास अशी जोरदार स्पर्धा रंगली होती. बिग बॉस शोच्या २६ व्या दिवशी अक्षयला दुसऱ्यांदा कॅप्टनपद मिळालं आहे. बिग बॉस मराठीच्या घरात सदस्यांमध्ये होणारी भांडणं, वाद, एकमेकांवरच्या कुरघोडया याची चर्चा तर असतेच. पण दर आठवड्याचा कॅप्टन कोण होणार याकडेही प्रेक्षकांचं लक्ष लागलेलं असतं. बिग बॉसच्या घरातील चौथ्या आठवड्याचा कॅप्टन बनत अक्षय केळकर याने लक्ष वेधलं आहे.
विकास सावंत आणि अक्षय केळकर यांच्यापैकी कॅप्टन कोण होणार याची लढत झाली. बिग बॉस मराठी शोच्या २६ व्या दिवशी रात्री कॅप्टन्सीसाठी धुवून टाक हा टास्क रंगला. गेल्या आठवड्याची कॅप्टन अपूर्वा नेमळेकर हिची कॅप्टनपदाची मुदत संपल्याने बिग बॉसने नवा टास्क ठेवला होता. गुरूवारच्या रात्री बिग बॉसने याची घोषणा केली. नव्या कॅप्टनपदासाठी कोणता टास्क असेल आणि त्याचे नियम काय असतील याची माहिती रूचिराने दिली. त्यापूर्वी अक्षय, अपूर्वा, अमृता आणि विकास या चार स्पर्धकांमध्ये सर्वात आधी कॅप्टन रूममध्ये कोण पोहोचणार याची स्पर्धा घेण्यात आली. विकास आणि अक्षय यांच्यात टायअप झाल्याने कॅप्टनपदासाठी लढण्याची संधी अक्षय आणि विकासला मिळाली.
प्रतिस्पर्धयाचा डिस्पले चांगला होणार नाही यासाठी टीमसदस्यांना त्यात खो घालायचा होता. विकासकडून किरण, प्रसाद, अमृता, तेजस्विनी तर अक्षयकडून रोहित, अपूर्वा, योगेश, रोहित होते. या टास्कमध्ये दोन्ही टीममध्ये चांगलीच जुंपली आणि अक्षयने कॅप्टनशीप मिळवली. सध्या बिग बॉस शोमध्ये दिवसेंदिवस रंगत येत आहे. गेल्या आठवड्यात भाग्य दिले तू मला या मालिकेतील राजवर्धन आणि कावेरी म्हणजेच विवेक सांगळे आणि तन्वी मुंडले यांनी हजेरी लावली. तर गायिका अमृता फडणवीस यांच्याही उपस्थितीने बिग बॉसच्या घरात मनोरंजनाचे बार उडाले. सदस्यांनी एकत्र दिवाळीही साजरी केली. आता पुढच्या भागात कोणता सदस्य या घरातून बाहेर पडणार हे ठरणार आहे. त्यामुळे उत्सुकता अधिकच वाढली आहे.