हिंदी बिग बॉसच्या घरातून अभिजित बिचुकले आणि देवोलीना भट्टाचार्य यांनी एक्झिट घेतली आहे. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडताच बिचुकले यांनी टीव्ही नाईनला एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत बिचुकले म्हणतात की, गेल्या २५० दिवसांपासून मी या बाहेरच्या जगापासून अलिप्त होतो. मात्र माझ्यासोबत ज्या ज्या गोष्टी बिग बॉसच्या घरात घडल्या आहेत त्या मी आता पाहिल्या आहेत. त्याच्यावर मी लवकरच एक पत्रकार परिषद घेऊन खुलासा करणार आहे. येत्या काही दिवसातच हिंदी बिग बॉसचा फिनाले आहे त्यामुळे मी दोन दिवस काहीच बोलणार नाही असे बिचुकले यांनी म्हटले आहे. हिंदी बिग बॉसच्या घरात अभिजित बिचुकले यांनी प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन केले होते.
मात्र देवोलीना सोबतच्या वादानंतर बिचुकले सलमान खानच्या निशाण्यावर आले होते. तर घरातील सदस्यांनी देखील त्यांच्यावर नाराजी दर्शवलेली पाहायला मिळाली होती. एक दोनदा विकेंड वॉरमध्ये सलमानने बिचुकलेना धारेवर धरले होते. आत येऊन तुला मारेल असेही म्हटले होते. तेव्हा बिचुकले यांना राग अनावर झाला होता रागाच्या भरात त्यांनी बिग बॉसचे घर सोडण्याचा निर्णय घेतला होता. याबाबत अभिजित बिचुकले म्हणतात की हिंदी बिग बॉसवाल्यांना माझी गरज होती, मला या घरातून बाहेर पडायचंच होतं परंतु त्यांना माझी गरज असल्याने मला त्या घरात ठेवण्यात आलं होतं. सलमान खान स्वताला काय समजतो? त्याला दाखवून देईल मी काय आहे. सलमान स्वताला भाई समजत असेल तर मी दादा आहे.
बिचुकले यांनी म्हटले आहे की येत्या दोन दिवसात फिनाले होणार आहे, तेवढे दिवस मी गप्प बसून राहणार आहे. त्यानंतर मी बिग बॉसच्या घरात काय काय चालतं याचा खुलासा करणार आहे. त्यासाठी मी एक पत्रकार परिषद घेणार आहे. पत्रकार परिषद घेऊन बिचुकले आता नेमका कुठला खुलासा करणार आहेत याची उत्सुकता निर्माण झाली आहे. बिचुकले यांनी मराठी बिग बॉसच्या घरात देखील हजेरी लावली होती. त्यावेळी देखील कुठल्या ना कुठल्या कारणास्तव ते चर्चेत राहिले होते. चर्चेत राहणारे बिचुकले यांनी काही महिन्यांपूर्वी पुण्यात कंदी पेढ्यांचे दुकान थाटले होते. व्यवसाय क्षेत्रात पदार्पण करत असताना शेफ पराग कान्हेरेने देखील उपस्थिती लावून बिचुकले यांना शुभेच्छा दिल्या होत्या.