साडे माडे तीन हा मराठी चित्रपट २००७ साली अंकुश चौधरी आणि सचित पाटील यांनी दिग्दर्शित केला होता. चित्रपटाला अशोक सराफ, मकरंद अनासपुरे, भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, अमृता खानविलकर, सुकन्या कुलकर्णी मोने, सुजाता जोशी, उदय टिकेकर सारखी भली मोठी स्टार कास्ट लाभली होती. या चित्रपटाचे छायालेखन संजय जाधव यांनी केले होते. नुकतेच संजय जाधव यांनी चित्रपटाची आठवण सांगताना अमृताचे तोंडभरून कौतुक केलेले पाहायला मिळते. साडे माडे तीन हा चित्रपट चलती का नाम गाडी या बॉलिवूड चित्रपटावर आधारित आहे. त्यामुळे मधुबाला सारखी कोणीतरी सुंदर हिरोईन चित्रपटात असावी म्हणून सर्वजण अभिनेत्रीच्या शोधात होते.
सगळ्या गोष्टी तयार होत्या मात्र चित्रपटाची नायिका फायनल झाली नव्हती. एक दिवस पुण्याहून एक मुलगी तिच्या आईला घेऊन ऑडिशन द्यायला आली होती. त्या मुलीला पाहताच संजय जाधव, अंकुश चौधरी आणि सचित पाटील यांनी तिची नायिका म्हणून निवड केली. अर्थात अमृताच्या सौंदर्याची भुरळ या सगळ्यांवर पडली होती. त्यामुळे आपल्याला नायिका मिळाली असा त्यांनी अमृता खानविलकरवर शिक्का मोर्तब केला. संजय जाधव म्हणतात की, आम्ही त्यावेळी अमृताला पहिल्यांदा बघितलं होतं आणि बघताच क्षणी आम्हाला ती चित्रपटाची नायिका म्हणून आवडली होती. मी खात्री नाही देऊ शकत की साडे माडे तीन हा तिचा पहिला चित्रपट असेल. कदाचित दुसरा किंवा तिसराही असू शकतो पण आम्ही तिला त्यादिवशी पहिल्यांदाच बघितलं होतं.
चलती का नाम गाडी मधलं एक लडकी भिगी भागीसी असं गाणं चित्रपटासाठी शूट करायचं होतं. मी सिनेमॅटोग्राफर असल्याने हिरोईन मधुबालासारखी दिसायला हवी ही माझ्यावर मोठी जबाबदारी होती. अमृताचा प्रत्येक लूक त्या कॅमेऱ्यात अतिशय सुरेख दिसत होता. ती स्वतः इतकी सुंदर आहे की, तिच्यावर कोणताही लाईट द्या ती सुंदरच दिसते असं मी नेहमी म्हणतो. या गाण्यामध्ये अमृताने माझं काम खुप सोपं करून टाकलं होतं. अंकुशला आणि सचितला हे गाणं अगदी साधं हवं असल्याने लिरीक्स अगदी साधे लिहून घेतले होते. गाण्याचा सेट लोणावळ्याला लागला होता. उमेश जाधवने देखील त्याची साधी कोरिओग्राफी केली. मला असं वाटतं मीच जरा माती खाल्ली काही काही शॉट्समध्ये. मला अजूनही वाटतं की आता जर मला हे गाणं परत करायला मिळालं असतं तर मी ते अजून छान केलं असतं.