प्रेक्षकांचे मनोरंजन करत टीआरपी वाढवण्यासाठी प्रत्येक मालिकेची चढाओढ चालू असते. मग विवाहसोहळा असो किंवा सणसमारंभ हा मनोरंजनाचा थाट प्रत्येक मालिकेत दाखवला जातो. कालच वटपौर्णिमा सण साजरा झाला, त्यामुळे मालिकांमध्ये देखील हाच ट्रेंड पाहायला मिळतो आहे. झी मराठी वाहिनीवरील माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत नुकतेच यश आणि नेहाचे लग्न झालेले पाहायला मिळाले. त्यामुळे नेहाची पहिली वटपौर्णिमा मालिकेतून साजरी केल्याचे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तर ठिपक्यांची रांगोळी मालिकेत देखील अप्पू पहिल्यांदाच वटपौर्णिमा साजरी करणार आहे.
परंतु या मालिकांमधून एक समान ट्विस्ट पाहून प्रेक्षक मात्र चिडलेले पाहायला मिळत आहेत. सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत गौरी वटपौर्णिमा साजरी करण्यासाठी जात असताना दगडाला ठेच लागून पडणार तितक्यात जयदीप तिथे येऊन तिला सावरण्याचा प्रयत्न करतो. गौरीला सावरत असताना तो तिला उचलून घेऊन वडाला फेऱ्या मारताना पाहायला मिळाला. ठिपक्यांची रांगोळी या मालिकेत देखील शशांक गाडीला धडकणार म्हणून अप्पू त्याला बाजूला ओढते आणि स्वतः खाली पडते. अप्पूला दुखापत झाल्याचे पाहून शशांक तिला उचलतो आणि वटपौर्णिमा साजरी करण्यासाठी जातो. तसेच माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत देखील असाच सिन दाखवण्यात आला.
नेहा वटपौर्णिमा साजरी करायला जात असताना एका दगडाला ठेच लागून अडखळते. तेवढ्यात यश येऊन तिला सावरतो आणि नेहाला उचलून घेत वडाच्या झाडाला फेऱ्या मारतो. मालिकांमधून हा एकसारखा सिन पाहून प्रेक्षक मात्र या मालिकांवर चांगलेच भडकलेले पाहायला मिळत आहेत. प्रत्यक्षात कोणाच्याच आयुष्यात असं घडत नाही, मात्र एखादा अपवाद प्रेक्षकांना रूचलाही असता. परंतु एकच सिन सर्व मालिकांमधून पाहायला मिळत असल्याने मालिकेच्या लेखकांनी हा नवा ट्रेंड सुरू केलेला पाहायला मिळू लागला आहे. मात्र प्रेक्षकांनी यावर नाराजी दर्शवलेली पाहायला मिळत आहे. एकिकडे पत्नीसोबत वडाला फेऱ्या मारणारा हिरो ट्रेंड होत असताना कलर्स मराठी वाहिनी काहीशी अपवाद ठरली.
सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेत देखील हटके अंदाजात वटपौर्णिमा साजरी करण्यात आली. लतिका म्हणजेच अक्षया नाईक हिच्या पायाला काही दिवसांपूर्वीच दुखापत झाली होती. गुडघ्याला झालेली दुखापत गंभीर असल्याने डॉक्टरांनी अक्षयाला विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. असे असूनही अक्षया सेटवर नेहमी हजर राहण्याचा प्रयत्न करते. तिला होणाऱ्या गैरसोयीमुळे मालिकेच्या कथानकात थोडासा बदल होणे साहजिक होते. सुरु असलेल्या ट्रेंडला बगल देऊन आता लतीकाच्या ऐवजी अभिमन्यू वडाला फेऱ्या मारताना दाखवला आहे. या वेगळ्या अन तितक्याच अनपेक्षित पण पटणाऱ्या गोष्टीचे महिला प्रेक्षकांनी खास कौतुकही केले आहे.