प्राजक्ता माळी म्हटलं की अभिनेत्री, नृत्यांगना, कवयित्री, निवेदिका निसर्गप्रेमी अशी अनेक विशेषणे ओठावर येतात. छोट्या पडद्यापासून ते अगदी सिनेमा पर्यंत प्राजक्ताने तिच्या अभिनयातून तिची एक खास जागा बनवली आहे. इतकेच नव्हे तर प्राजक्ता सोशल मीडियावर देखील खूप ॲक्टिव्ह आहे. प्राजक्ताने तिचा आकर्षक फोटो टाकला की चाहत्यांकडून कमेंटचा अगदी वर्षाव होत असतो. प्राजक्ताच्या प्रत्येक पोस्टमध्ये तिचं मनभरून कौतुक करणारे चाहते मात्र तिच्या एका नव्या पोस्टवर तिला लग्न न करण्याचा सल्ला देत आहेत. प्राजक्ता तू लग्न कधी करणार या प्रश्नाने तिला भंडावून सोडणारे चाहते, सध्या मात्र तू लग्न करू नकोस असं का म्हणताहेत हे खूप मजेशीर आहे.
प्राजक्ताने तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वर काही फोटो पोस्ट केले. यामध्ये ती एका लग्नाला नटूनथटून गेल्याचे दिसते. श्रद्धा काकडे हिच्या लग्नातील हे फोटो प्राजक्ताने शेअर केलेत. श्रद्धाला लग्नाच्या शुभेच्छा देत असतानाच प्राजक्ताने एक मिश्किल कॅप्शन दिली आहे. यामध्ये ती असं म्हणत आहे की, श्रद्धा तुला लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा. आणखी एकाचा बळी गेला. असो! तुला तुझ्या पुढील आयुष्यात खूप आनंद मिळेल असं म्हणत प्राजक्ताने नववधू श्रद्धाची फिरकी घेतली आहे. पोस्ट केलेल्या या सगळ्या फोटोमध्ये अनेक कॅंडिड फोटोदेखील आहेत. फोटोंवरून तर असे दिसते की प्राजक्ताच्या जवळच्या खास मैत्रिणीचं लग्न आहे. याच फोटोवरून चाहत्यांनी प्राजक्ताला लग्नावरून छेडलं नाही तर तिला लग्न न करण्याचा सल्ला दिला.
चाहते प्राजक्ताला कमेंटमध्ये असे म्हणतात की, इतक्यात लग्न करू नकोस कारण तुझ्याशी लग्न करण्याची इच्छा बऱ्याच तरुणांमध्ये आहे. त्यामुळे सध्या तरी तुला इंप्रेस करण्यासाठी त्यांच्यात स्पर्धा सुरू आहे. प्राजक्ताने पोस्ट केलेल्या फोटो इतकीच प्राजक्ताला कमेंट मध्ये चाहत्यांनी दिलेला हा सल्ला देखील सध्या व्हायरल होतोय. जुळून येती रेशीमगाठी या मालिकेतून प्राजक्ता माळी हिने तिच्या अभिनयातील कारकीर्द सुरू केली. खरेतर प्राजक्ताला अभिनयात यायचंच नव्हतं. तिला नृत्यातच करिअर करायचं होतं पण नृत्य आणि अभिनय या एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याने तिला अभिनयातही रुची वाटू लागली. पण अभिनय सुरू असतानाही तिने नृत्यचा प्रवास थांबवलेला नाही. नृत्यात अजून तिला खूप गोष्टी करायच्या आहेत असं ती नेहमी सांगते.
प्राजक्ताचं लग्न सोशल मीडियावर नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. काही दिवसांपूर्वी प्राजक्ताने आकर्षक नववारी साडीमध्ये फोटोशूट केलं होतं. तेव्हा मात्र प्राजक्ता तू लग्न कधी करणार असं विचारून तिच्या चाहत्यांनी तिला भंडावून सोडलं होतं. गेल्याच महिन्यात प्राजक्ताने तिच्या आई सोबत एक मोठी ट्रिप केली आणि या काळामध्ये तिने तिच्या आईबरोबर खूप चांगला वेळ घालवला. प्राजक्ताला भटकंती करायलाही खूप आवडतं. सध्या प्राजक्ता महाराष्ट्राची हास्य जत्रा या शोचं निवेदन करत आहे. वा दादा वा हे तिचे शब्द याच शो मुळेच गाजले. केवळ फनी व्हिडिओ किंवा ग्लॅमरस फोटोसाठी प्राजक्ता सोशल मीडियाचा वापर करत नाही. तर निसर्गाची जपणूक, योग्य आहार याबाबतही प्राजक्ता तिचे अनुभव चाहत्यांशी शेअर करत असते.