किचन कल्लाकार हा झी मराठी वाहिनीवरील शो या आठवड्यात ४ दिवस प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसणार आहे. हे तर काहीच नाय हा शो प्रेक्षकांच्या कमी प्रतिसादामुळे काही कालावधीतच आटोपता घेण्यात आला. गेल्या आठवड्यात शुक्रवारी आणि शनिवारी या शोमध्ये चला हवा येऊ द्या मधील काही कलाकार मंडळींनी हजेरी लावली होती. हा या शोचा शेवटचा एपिसोड ठरला होता. आता या मालिकेच्या जागी किचन कल्लाकारने तात्पुरती भर टाकलेली पाहायला मिळणार आहे. कारण पुढील आठवड्यापासून म्हणजेच १८ मार्चपासून रात्री ९.३० वाजता बँड बाजा वरात हा रिऍलिटी शो झी वाहिनीवर दाखल होणार आहे.

प्रेक्षकांच्या मनोरंजनात व्यत्यय येऊ नये याची खबरदारी म्हणून आठवड्यापुरता किचन कल्लाकार शो बुधवार ते शनिवार असा चार दिवस प्रसारित होणार आहे. संकर्षण कऱ्हाडे सध्या नाटकांच्या दौऱ्यामध्ये व्यस्त असल्यामुळे त्याच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी श्रेया बुगडे स्वीकारताना दिसणार आहे. कुशल बद्रिके आणि रोहिणी हट्टंगडी आज किचन कल्लाकारच्या मंचावर दाखल होणार आहेत. कुशल आपल्याकडील धमाल किस्स्यांनी नेहमीच प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसतो. असेच खाण्याबाबतही त्याचे धमाल किस्से तो शेअर करणार आहे. कुशलला खेकडा कसा खातात हेच मुळात माहीत नव्हते. तू आधी प्रयत्न तर कर असे विजू माने यांनी म्हटल्यावर एकदा कुशलने खेकड्याची नांगी घेऊन दाताने मोडली, नांगी सोबत कुशलची दाढ देखील तुटली.

असा हा भन्नाट किस्सा तो प्रशांत दामले याना ऐकवत असतो. कुशल आणि श्रेया चला हवा येऊ द्या या शोमुळे एकमेकांना खूप चांगले ओळखतात. कुशलची बायको सूनयनाला देखील त्याचे बरेचसे किस्से माहीत नाहीत जेवढे श्रेयाला माहिती आहेत असे तो आवर्जून सांगतो. याबाबत कुशल म्हणतो की, ‘माझ्या बायकोला माहीत नाहीत, तेवढे माझे सिक्रेटस श्रेया बुगडेला माहित आहेत. त्यामुळे ती अँकर असलेल्या शोवर जाताना काळजात धडधडत होतंच. पण शूटिंगच्या दरम्यान लक्षात आलं की माझं ते धडधडणं उगाच नव्हतंच. अँकर म्हणून श्रेया किचन कल्लाकार मध्ये धुमाकूळ घालते, पण प्रत्यक्ष आयुष्यात तिचे किचनमधले प्रताप आम्ही (हवा येऊ द्या ची टीम) आवडीने चघळतो.
पण सूड म्हणून श्रेया बुगडे एक दिवस आम्हाला अशी उघड्यावर पाडेल असं मात्र वाटलं नव्हतं. विशेष बाब या कार्यक्रमासाठी माझी खास तयारी, माझी बायको सुनयना आणि भाऊ कदमची बायको ममता वहिनी यांनी करून घेतली. त्यांनी शिकवलेल्या पदार्थांपैकी एखादी डिश मला बनवायला दिली असती, तर कदाचित माझी अब्रू वाचली असती. असे कुशलने सोशल मीडियावर म्हटले आहे. त्यामुळे कुशलकडे आणखी कुठले धमाल किस्से आहेत ते ऐकण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे.