अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक महेश मांजरेकर यांची काही महिन्यांपूर्वी कर्करोगावरील शस्त्रक्रिया पूर्ण झाली होती. शस्त्रक्रिया करून झाल्यानंतर त्यांच्या प्रकृतीमध्ये हळूहळू सुधारणा झालेली पाहायला मिळते आहे. अंतिम या हिंदी चित्रपटाचे दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी केले, कर्करोगावर मात करत ते ह्या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण करण्यात व्यस्त होते. असे सलमान खानने अंतिम चित्रपटाच्या प्रमोशनवेळी सांगितले होते. त्यानंतर त्यांनी मराठी बिग बॉसची धुरा सांभाळली.
मराठी बिग बॉस मधील महेश मांजरेकर यांच्या हटके लूक मुळे ते खूपच चर्चेत राहिले. चावडीवर आपल्या परखड मतांनी त्यांनी नेहमीच स्पर्धकांची पाठराखण केली, तर कधी खडेबोल देखील सुनावले. सध्या सुरु असलेल्या हिंदी बिग बॉस सिझन १५ मधील एका भागामध्ये बिग बॉस मराठीचे होस्ट दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी नुकताच सहभाग घेतला होता. आपल्या हटके अंदाजात स्पर्धकांसोबत प्रामाणिक मते दिल्याने प्रेक्षकांची मने त्यांनी जिंकून घेतल्याचे पहायला मिळाले. नेटकरी नेहमीप्रमाणेच महेश मांजरेकर यांच्या रोखठोक मतांवर प्रभावित झालेले पाहायला मिळतात अशी त्याच्याबाबत सर्वत्र जोरदार चर्चा आहे. प्रेक्षकांनी त्यांना उत्कृष्ट होस्ट असल्याचे विविध ट्विट द्वारे कळविले आहे. तर अगदी काहींनी बिग बॉसच्या निर्मात्यांना सलमान खानऐवजी महेश मांजरेकर यांना कायमचे सूत्रसंचालन करण्याचे आवाहन केले आहे. बिग बॉसच्या घरात रोजच्या आव्हानांना सामोरे जात स्पर्धकांची होणारी कसरत महेश मांजरेकर यांनी जवळून अनुभवली होती. उत्कृष्ट सूत्रसंचालनाची चुणूक दाखवीत मराठीतील चावडी प्रमाणेच त्यांनी सर्वांना स्पर्धकांचे खरे रूप दाखविले. यावरून टास्क मधून होणाऱ्या चुकांमधून नक्की काय केले पाहिजे याचा अंदाज स्पर्धकांना नक्कीच आला असणार.
अशाप्रकारे स्पर्धकांबद्दल परखड मते मांडल्याने स्पर्धकांमध्ये थोडीशी नाराजी पाहण्यात मिळाली खरी, पण खिलाडू वृत्तीने त्यांनी महेश मांजरेकर यांच्या मतांचा स्वीकार देखील केलेला पाहायला मिळाला. बऱ्याचदा सलमान ठराविक स्पर्धकांची बाजू घेत असल्याचे नेटकऱ्यांच्या निदर्शनात आले होते, पण महेश यांच्या बाबतीतील प्रेक्षकांचा अनुभव खूपच वेगळा दिसल्याने त्यांनी सलमान ऐवजी मांजरेकरच कायमस्वरूपी संचालक व्हावेत या मागणीने आता जोर धरला आहे. त्यांचा हा अल्पावधीचा मराठीबाणा हिंदी प्रेक्षकांना मनापासून आवडल्याचे जाणवते. मराठी बिग बॉसची जबाबदारी खंबीरपणे निभावत असताना महेश मराठी सिझन ३ पूर्ण झाल्याशिवाय हिंदी कडे तूर्तास वळणार नाहीत असे वाटते.