झी मराठी वाहिनीवर लवकरच एक रिऍलिटी शो दाखल होणार आहे ज्याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. येत्या २४ जून पासून गुरुवार, शुक्रवार, शनिवार रात्री ९.३० वाजता झी मराठी वाहिनी “सारेगमप लिटिल चॅम्प्स” हा शो घेऊन येणार आहे. या शोचे सूत्रसंचालन प्रसिद्ध अभिनेत्री “मृण्मयी देशपांडे – राव” साकारणार आहे.
मृण्मयी म्हणते की, मी अकरावी पर्यंत शास्त्रीय संगीताचे धडे गिरवले आहेत. माझी आई आणि बहीण गौतमी देशपांडे या खूप उत्तम गातात त्यामुळे घरात नेहमी संगीताला प्राधान्य दिलं जातं. खर तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मीच करावे अशी माझ्या आईची खूप ईच्छा होती. आज ती या शोच्या माध्यमातून पूर्ण होताना दिसणार आहे. मृण्मयी देशपांडे ही उत्तम अभिनेत्री तर आहेच शिवाय ती एक उत्तम सूत्रसंचालन देखील करते. प्रेक्षकांना आणि पर्यायाने स्टेजवरील वातावरण हसत खेळत कसं ठेवायचं हे तिला चांगलंच ठाऊक आहे शिवाय गायनातील बारकावेही तिला अवगत असल्याने ती ही भूमिका अतिशय चोख बजावेल यात शंका नाही.
या कार्यक्रमाची आणखी एक खासियत म्हणजे पहिल्या सिजनचे पहिले पाचही स्पर्धक कार्तिकी गायकवाड, मुग्धा वैशंपायन, आर्या आंबेकर, रोहित राऊत, प्रथमेश लघाटे हे पाचही जण पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर परीक्षकाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. हे पाचही जण अनेकदा वेगवेगळ्या मंचावरून आपल्या गायनाने कार्यक्रम रंगवताना दिसले त्यामुळे यांच्यात खूपच छान बॉंडिंग तयार झाले आहे. २००८ ते २००९ या साली “सा रे ग म प लिटिल चॅम्प्स” नंतर हे पाचही जण आता परीक्षकाच्या भूमिकेत दिसणार म्हटल्यावर प्रेक्षकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहे. हा शो येत्या २४ जून पासून ९.३० वाजता प्रक्षेपित होणार आहे. झी वाहिनीची “काय घडलं त्या रात्री” ही मालिका काही दिवसांपूर्वी बंद पडली त्याजागी आता हा शो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काय घडलं त्या रात्री या मालिकेचे कथानक उत्तम असून आणि त्यात उत्तम कलाकार असूनही ही मालिका केवळ चित्रीकरण लांबवल्याने बंद करण्यात आली अर्थात या मालिकेचे काहीच भाग शिल्लक राहिले असतानाही त्यांनी ही मालिकाच बंद करण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्रात चित्रीकरणासाठी आज सोय असूनही ही मालिका आता अर्ध्यावरच थांबवण्यात आली आहे. आणि त्याजागी सारेगमप लिटिल चॅम्पची जोरदार तयारी पाहायला मिळाली. खरं तर या शोची घोषणा खूप अगोदरच करण्यात आली होती मात्र लहान मुलांवर कुठलेही संकट येऊ नये यासाठी शो पुढे ढकलण्यात आला. शोमध्ये पार्टीसिपेट होत असलेल्या छोट्या स्पर्धकांची ऑनलाइन निवड करण्यात आली असून हे छोटे स्पर्धक कोण कोण आहेत हे येत्या काही दिवसातच रसिक प्रेक्षकांना पाहायला मिळेल.