सुपरस्टार विनोदी अभिनेते म्हणून आपल्या सर्वांच्या परिचयाचे असलेले तरी वजीर चित्रपटातील त्यांनी साकारलेला राजकारणी असो वा चौकट राजा चित्रपटातला निरागस मित्र , वाट पाहते पुनवेची मधला खलनायक असो वा अशी ही बनवा बनवी मधला धनंजय माने…अशा विविध पैलूमधून त्यांच्या अभिनयाची झलक देऊन प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारे सुपरस्टार अशोक सराफ, आपले अशोकमामा.
मूळगाव बेळगाव असलेले अशोक सराफ यांचा जन्म झाला तो मुंबईत. मुंबईतील डी जी डी विद्यालयात त्यांनी शिक्षण घेतले. १९६७ साली अशोक सराफ यांचे रंगभूमीवर पहिले पाऊल पडले ते अनपेक्षितपणेच, रंगकर्मी गोपीनाथ सावकार हे अशोक सराफ यांचे मामा . त्यांच्या नाटकाच्या तालमीला अशोक सराफ नेहमी हजर राहायचे. त्यामुळे ‘ ययाती आणि देवयानी’ हे नाटक त्यांना अगदी तोंडपाठ झाले होते. एकदा बेळगावात असताना नाटकातील छोटू सावंत हा कलाकार आजारी पडला त्यावेळी ‘तू या धंद्यात अजिबात यायचं नाही…’ असं म्हणणाऱ्या मामांनीच अशोक सराफ यांना विदूषकाची भूमिका दिली. नाटकातील विदूषकाची भूमिका अशोक सराफ यांनी इतकी चांगली रंगवली की पुढे ही भूमिका त्यांच्याचकडे आली. या भूमिकेमुळे अशोक सराफ तुफान हिट झाले. त्यानंतर त्यांनी कधी मागे वळून पाहिलेच नाही. पांडू हवालदार, आत्मविश्वास, गंमत जंमत, आमच्यासारखे आम्हीच, नवरी मिळे नवऱ्याला, आयत्या घरात घरोबा, भुताचा भाऊ, फेका फेकी, सगळीकडे बोंबाबोंब, धुमधडाका अशी अनेक हिट चित्रपटांची यादीच त्यांनी प्रेक्षकांसमोर मांडली.
विनोदाचे अचूक टायमिंग हेरून लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ यांच्या जोडगोळीने प्रेक्षकांना खळखळून हसवले. मधल्या काळात मराठी सृष्टीला सावरण्यास या कलाकारांनीच मोठा हातभार लावला हे विसरून चालणार नाही. एवढेच नाही तर गुप्त, जोरु का गुलाम, बेटी नं 1, कोयला, येस बोस, करण अर्जुन अशा अनेक बॉलिवूड हिट चित्रपटातून त्यांनी महत्वाच्या भूमिका गाजवल्या. हम पांच ही हिंदी मालिका देखील त्यांनी अभिनित केली होती. मधल्या काळात त्यांनी पत्नी निवेदिता सोबत मिळून स्वतःचे प्रोडक्शन हाऊस उभारले यातून काही मालिकांची निर्मिती त्यांनी केली होती मात्र प्रोडक्शन हाऊसला लागलेल्या आगीमुळे आणि दर्लक्षामुळे ही निर्मिती संस्था बंद पडली.
रंगभूमीवर निवेदिता सराफ आणि अशोक सराफ यांनी मिळून एकत्रित काम केले आहे. या व्यस्त शेड्युलमधून अधून मधून ते चित्रपट देखील साकारताना दिसतात. सत्तरच्या दशकापासून ते आतापर्यंत जवळपास ५ दशकाहून अधिक काळ कलाक्षेत्राला देणाऱ्या या कलाकाराला ‘अभिनयाचा बादशहा’ म्हणून संबोधले तर वावगे ठरायला नको….